पिंपरी : महेशनगर, संत तुकारामनगर येथील पदपथ तोडून उद्यानाची भिंत मागे घेत अनधिकृतपणे २२ टप-या ठेवण्यात आल्या आहेत. या टपऱ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या चायनीज खाद्यपदार्थ व पानपट्टीवाल्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण वाढून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. तसेच, येथील शांतता भंग होणार असल्याने या टपऱ्या हटविण्याची मागणी रहिवाशांनी महापालिकेकडे केली आहे. स्थानिक नगरसेवकाच्या दबावामुळे महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसले असून, कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.महेशनगरमध्ये पूर्वी पीसीएमटीचा डेपो होता. त्याचे स्थलांतर झाल्याने त्या जागेत महापालिकेने ३ वर्षांपूर्वी सार्वजनिक उद्यान विकसित केले. या उद्यानाच्या उजवीकडील बाजूचे पदपथ काढून टाकण्यात आले. उद्यानाची भिंत सुमारे ७ फूट आत घेण्यात आली. या ठिकाणी गेल्या रविवारी (दि.१०) नव्या टपऱ्या आणून ठेवल्या आहेत. ५ बाय ६ फूट आकाराच्या एकूण २२ टपऱ्या आहेत. त्यांमध्ये चायनीज खाद्यपदार्थ, पानपट्टी आदी व्यवसाय केला जाणार आहे. यामुळे रस्ता व्यापला जाणार आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता होऊन आरोग्याचा प्रश्नही आहे. या संदर्भात दीड महिन्यापूर्वी उद्यानात बैठक झाली होती. रहिवाशांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, स्थानिक नगरसेवकाने दादागिरीची भाषा वापरत ‘काय करायचे ते करा; मला कोणी रोखू शकत नाही,’ असे दटावत थेट दम भरला. आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. केवळ करू, पाहू, बघू अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संत तुकारामनगरमध्ये पदपथ हटवून टप-या
By admin | Updated: August 13, 2014 04:29 IST