सहजीवन म्हणजे सुंदर नात्यांचा संवाद
By Admin | Updated: March 22, 2017 03:26 IST2017-03-22T03:26:16+5:302017-03-22T03:26:16+5:30
‘सहजीवन’ हा शब्द खूप फसवा आहे. सध्याच्या काळात या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांना सन्मानाने

सहजीवन म्हणजे सुंदर नात्यांचा संवाद
पुणे : ‘सहजीवन’ हा शब्द खूप फसवा आहे. सध्याच्या काळात या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांना सन्मानाने आणि मित्रत्वाने वागवतात, एकत्रित संसार करूनही परस्परांच्या अस्तित्वावर आक्रमण करीत नाहीत, अशा सुंदर नात्यातून निर्माण होते ते सहजीवन, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी ‘सहजीवना’ची व्याख्या अधोरेखित केली. पूर्वीच्या काळातील आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक, बाया कर्वे यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांना हे सहजीवन लाभले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पुणे नगर वाचन मंदिर संस्थेतर्फे डॉ. नीला पांढरे यांच्या ‘सहजीवनातील प्रकाशवाटा’ या ग्रंथास डॉ. धोंगडे यांच्या हस्ते ‘कै. श्री. ना. बनहट्टी ग्रंथ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण, कार्यवाह अरविंद रानडे आणि लेखिका डॉ. नीला पांढरे उपस्थित होत्या.
डॉ. नीला पांढरे यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. ‘सहजीवन’ या संकल्पनेवर माझा विश्वास आहे. यशस्वी महिलेच्या मागे नक्कीच एक पुरुष उभा असतो. या पुस्तकात ११ समाजसुधारकांच्या सहजीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. रवींद्र घालवलकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)