‘सह्याद्री’ची सुधागड-सरसगड मोहीम यशस्वी

By Admin | Updated: November 30, 2015 01:17 IST2015-11-29T23:44:23+5:302015-11-30T01:17:29+5:30

रायगड जिल्हा : साताऱ्यासह, सांगली, पुणे येथील युवकांचा सहभाग

Sahadri's Sudhagad-Sarasgarh campaign is a success | ‘सह्याद्री’ची सुधागड-सरसगड मोहीम यशस्वी

‘सह्याद्री’ची सुधागड-सरसगड मोहीम यशस्वी

सातारा : रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र पालीच्या बल्लाळेश्वराचे पवित्र सान्निध्य लाभलेले सुधागड व सरसगड हे बुलंद किल्ले, येथील सह्याद्री ट्रेकिंगने आयोजित केलेल्या साहसी गडकोट मोहिमेदरम्यान अनेक ट्रेकर्सनी यशस्वी पूर्ण केले.
अनुभवी गिर्यारोहक कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या साहसी मोहिमेत सातारा, सांगली, कोरेगाव, पिंपरी-चिंचवड पुणे येथील गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता. कोरेगाव येथील ‘शर्वीन गोसावी’ हा दहा वर्षे वयाचा सर्वांत लहान गिर्यारोहक सहभागी झालेला होता. तीन दिवस चाललेली ही मोहीम सर्वार्थाने आव्हानात्मक ठरली. कोकणातील हवेतील दमटपणा, उकाडा, तीव्र उन्हाचा प्रचंड त्रास, सरळ उंच चढाई, दमछाक करायला लावणारी ही अवघड मोहीम सर्वांनीच यशस्वी पूर्ण केली. सरसगडावर सरळ उंचीच्या पायऱ्या चढाव्या लागतात. कड्यामध्ये खोदलेल्या या पायऱ्यांचा मार्ग नैसर्गिक तयार झालेल्या खिंडीतून जातो. याच्या बालेकिल्ल्यावर पोहोचण्यासाठी छोटेसे प्रस्तरारोहण करावे लागले. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सह्याद्री ट्रेकिंगचे प्रशिक्षित गिर्यारोहक सनी यवतकर, प्रतीक साळुंखे, मानसी सदामते, उर्वशी पवार, अभिजित धुमाळ, निखील सावंत, अजिंक्य कदम, अनिल दाणी, अथर्व अवसरे, प्रणव महामुने यांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

सह्याद्रीचे विहंगम दृश्य
सुधागडावर जाण्यासाठी अक्राळविक्राळ खोल दरीवरील लटपटत्या लोखंडी शिड्या पार करताना काळजाचा ठोका चुकतो. येथील टकमक टोकाचा खोल कडा पाहताना छातीत धडकी भरते. ५५ एकरांच्या विस्तीर्ण सुधागडावरून राकट सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहताना चिमुकले ट्रेकर्स भरावून गेले. येथून तेलबैला, सरसगड, धनगड व कोरीगड हे किल्ले अप्रतिम दिसतात. सर्वच सहभागी ट्रेकर्सनी प्रतिकूल हवामानावर मात करून कौतुकास्पद चढाई केली.

Web Title: Sahadri's Sudhagad-Sarasgarh campaign is a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.