जुन्नर, खेड, पुरंदरवर शिवसेनेचा भगवा
By Admin | Updated: March 15, 2017 03:22 IST2017-03-15T03:22:18+5:302017-03-15T03:22:18+5:30
जुन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या ललिता चव्हाण व उपसभापतिपदी काँग्रेसचे उदय भोपे यांची निवड झाली

जुन्नर, खेड, पुरंदरवर शिवसेनेचा भगवा
जुन्नर : जुन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या ललिता चव्हाण व उपसभापतिपदी काँग्रेसचे उदय भोपे यांची निवड झाली. सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या ललिता चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनघा घोडके यांचा ८ विरुद्ध ६ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उदय भोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांचा ८ विरुद्ध ६ मतांनी पराभव केला.
पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या निवडणुकीत उपस्थितीत सदस्यांनी हात वर करून मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांतधिकारी कल्याण पांढरे होते. पंचायत समितीच्या निवडणुकीत १४ जागांपैकी ७ जागा शिवसेनेने काबीज केल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळविला होता, तसेच काँग्रेसने पंचायत समितीच्या एका जागेवर विजय मिळवित अस्तित्व राखले होते.
विजयासाठी ८ मतांची आवश्यकता असल्याने काँग्रेसच्या एकमेव सदस्यांच्या भूमिकेवरच सभापती निवडणुकीचे भवितव्य अवलंबून होते. पंचायत समितीमधे काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे संकेत काँग्रेस नेतृत्वाने दिलेले होते. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ (७+१=८) वाढले होते.
या वेळी सभापतिपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे सावरगाव गणातून सर्वसाधारण जागेवर निवडून आलेल्या ललिता चव्हाण यांना शिवसेनेकडून संधी देण्यात आली. शिवसेनेला बहुमतासाठी एका मताची गरज असल्याने काँग्रेस पक्षाच्या एकमेव निवडून आलेल्या उदय भोपे यांच्या मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. अपेक्षेप्रमाणे भोपे यांनी शिवसेनेची पाठराखण केली व त्या बदलात उपसभापतिपद काँग्रेसकडे राखण्यात पक्षाला यश आले.
शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, जिल्हा उपप्रमुख शरद चौधरी, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, युवा सेनेचे जिल्हा पदाधिकारी गणेश कवडे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, गुलाबराव पारखे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, जीवन शिंदे, काळू गागरे, रमेश खुडे, मंगल उंडे, अर्चना माळवदकर, मावळत्या पंचायत समिती सभापती संगीता वाघ आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
गटनेत्या आशाताई बुचके यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंचायत समिती निवडणुकीत झालेली युती स्वार्थासाठी नव्हे, तर जनतेच्या कल्याणासाठी झाली आहे, असे सांगितले. विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी राजकारण नव्हे, तर तालुक्याच्या विकासाचा विचार व त्याची अंमलबजावणी पंचायत समितीच्या माध्यमातून व्हावी, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली. (वार्ताहर)
खेड : सभापतिपदी सेनेच्या सुभद्रा शिंदे,
उपसभापतिपदी काँग्रेसचे अमोल पवार
राजगुरुनगर : खेड पंचायत समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या सुभद्रा विष्णू शिंदे यांची, तर उपसभापतिपदी काँग्रेसचे अमोल गुलाब पवार यांची निवड झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेला काँग्रेसने साथ दिल्याने पहिल्यांदाच खेड पंचायत समितीवर भगवा फडकला आहे.
आज सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव तथा गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार यांनी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व चौदा सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये शिवसेना सात, राष्ट्रवादी चार, भाजपा दोन व काँग्रेस एक अशी संख्या होती. सभापतिपदासाठी शिवसेनेकडून सुभद्रा शिंदे, तर भाजपाकडून धोंडाबाई खंडागळे यांनी अर्ज दाखल केले, तर उपसभापतिपदासाठी काँग्रेसकडून अमोल पवार, राष्ट्रवादीकडून अरुण चौधरी व भाजपाकडून चांगदेव शिवेकर यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, अर्ज माघारीच्या वेळेमध्ये सभापतिपदाच्या निवडणुकीतून खंडागळे यांनी, तर उपसभापतिपदाच्या निवडणुकीमधून चौधरी व शिवेकर यांनी माघार घेतली. दोन्हीही पदांसाठी शिंदे व पवार यांचे अर्ज राहिल्यामुळे गाढे यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गुलाल व भंडार उधळून व फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
सभापती सुभद्रा शिंदे व उपसभापती अमोल पवार यांनीही विकासकामांमध्ये कोणतेही राजकारण न आणता तळागाळापर्यंत विकासकामे पोहचविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, रूपाली कड, पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर, अंकुश राक्षे, अमर कांबळे, सुनीता सांडभोर, ज्योती अरगडे, वैशाली जाधव, जिल्हा प्रमुख राम गावडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय डोळस, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख विजया शिंदे, दूधसंघाचे संचालक शेख, किरण मांजरे, शिवाजी वर्पे, काँग्रेसचे भास्कर तुळवे, सुभाष गाढवे, माजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाणे, गणेश सांडभोर, पांडुरंग बनकर, मारुती सातकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)