सुरक्षित प्रवास देणारेच असुरक्षित
By Admin | Updated: March 21, 2016 00:24 IST2016-03-21T00:24:43+5:302016-03-21T00:24:43+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली येथील वसाहत अनेक समस्यांनी घेरली आहे. ‘जे काही आहे, बरंच आहे’ अशी परिस्थिती आहे.

सुरक्षित प्रवास देणारेच असुरक्षित
सांगवी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली येथील वसाहत अनेक समस्यांनी घेरली आहे. ‘जे काही आहे, बरंच आहे’ अशी परिस्थिती आहे. राज्यात सुरक्षित प्रवास देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मात्र राहण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ निवास उपलब्ध होऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. वसाहतीमध्ये नीट रस्ते नाहीत. कचरा टाकण्यासाठी कुंड्या नाहीत. रस्त्यावर कचरा साचला आहे. लहान मुलांसाठी असलेली खेळणी तुटून भंगार झाली आहेत, मोकाट जनावरांचा त्रास अशा विविध समस्यांनी ही वसाहत वेढलेली आहे. अशाच अवस्थेत येथे १२० कुटुंबे राहत आहेत.
मुळातच वसाहत परिसरात मुख्य प्रवेशदार किंवा फाटक नसल्याने लगेचच घरांच्या रांगा सुरू होतात. १२० खोल्यांच्या या वसाहतीत दोन घरांच्या रांगांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त गवत वाढलेले आहे. तेथूनच सांडपाणी वाहत असल्याने परिसरात डासांचा उपद्रव आहे. संध्याकाळच्या वेळात घराबाहेर बसणेदेखील कठीण आहे.
कॉलनीच्या कडेने सुरक्षा भिंत नसल्याने या ठिकाणी कुत्र्यांचा, तसेच डुकरांचा त्रास आहे. लहान मुलांना कुत्रा चावल्याच्या घटना अलीकडेच झाल्या आहेत. तरी देखील याभागात कुत्र्यांचा काहीही बंदोबस्त करण्यात आलेला नाही. भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळात धोकादायक ठरू शकते. वसाहतीला लागूनच असलेल्या भागात इतरही लोक कचरा टाकत असतात, त्यामुळे डुकरांचा वावर आहे. डुकरांमुळे कचरा पसरला जातो. संरक्षक भिंत नसल्याने या ठिकाणी वसाहतीमागील गावातील गाई वसाहतीत फिरत असतात. लहान मुलांना याचा गंभीर त्रास होऊ शकतो. तसेच ठिकठिकाणी शेण पडलेले असते. मोकळ्या जागेत वाढलेले गवत काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही.
वसाहतीतील घरे सुस्थितीत असली, तरी पक्क्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या वसाहतीत रस्त्यांचे डांबरीकरण नाही. तसेच काँक्रीटीकरण केलेले नाही. खडी व डांबर निघून गेल्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या किंवा घरगुती वापरासाठी पाण्याच्या समस्या नसल्या, तरी पावसाळ्यात अनेक घरे गळतात. भिंतीत पाणी पाझरत असल्याने घरात ओल राहते.
वसाहतीसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. रखवालदार नाही. या ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी झाल्याच्या घटना आहेत. अलीकडेच १५ दिवसांपूर्वी एक-दीड लाखाची चोरी झाल्याची घटना आहे. काही वर्षांआधी वसाहतीला तारांचे कुंपण होते; परंतु वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेऊन रहिवाशांनी काही भागात स्वखर्चातून पत्रे बसवून घेतल्याचे समजले.
दोन महिन्यांपूर्वी आमदार निधीतून जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे. त्याचा वापर होत आहे. लहान मुलांसाठी मात्र या ठिकाणी बालोद्यानाची जागा असूनदेखील सोयी-सुविधांची वानवा आहे. या ठिकाणी बसविलेली खेळणी पूर्णत: गंजली असून, त्यांची अवस्था खराब आहे. घसरगुंडीवरील पत्रा गंजला असून, बऱ्याच ठिकाणी फाटलेला आहे. अशा घसरगुंडीवर खेळल्यास लहान मुलांना अपाय होऊ शकतो.