ग्रामीण पोलीस ‘मारणे’च्या बालेकिल्ल्यात

By Admin | Updated: November 6, 2014 23:54 IST2014-11-06T23:54:41+5:302014-11-06T23:54:41+5:30

कुख्यात नीलेश घायवळ टोळीचा सराईत गुन्हेगार पप्पू गावडे याच्या खुनाच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गजा मारणे टोळीचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये गुरुवारी रात्री ‘सर्च आॅपरेशन’ राबवले

Rural Police in the Cemetery of 'Marne' | ग्रामीण पोलीस ‘मारणे’च्या बालेकिल्ल्यात

ग्रामीण पोलीस ‘मारणे’च्या बालेकिल्ल्यात

पुणे : कुख्यात नीलेश घायवळ टोळीचा सराईत गुन्हेगार पप्पू गावडे याच्या खुनाच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गजा मारणे टोळीचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये गुरुवारी रात्री ‘सर्च आॅपरेशन’ राबवले. कुख्यात गजा मारणे याच्यासह गुंडांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीच्या वजनदार गुंडांकडून आपल्याला हजर करुन घेण्याकरिता धडपड केली जात आहे. परंतु पोलिसांनी गुंडांची ही विनंती धुडकावत त्यांना शोधून काढण्याचे आव्हान स्वीकारले आहे.
संतोष उर्फ पप्पू हिरामण गावडे (रा. लवळे, ता. मुळशी) याचा सोमवारी रात्री धारदार हत्याराने वार करुन खून करण्यात आला होता. शहराला एकेकाळी हादरवून सोडणा-या बोडके मारणे टोळी युद्ध थंडावल्यानंतर घायवळ आणि मारणे टोळीमध्ये टोळी युद्ध भडकले. एकेकाळी गजा मारणेच्याच टोळीमध्ये असलेल्या निलेश घायवळने टोळीमधून बाहेर पडल्यावर स्वत:ची टोळी सुरु केली. मारणेसह त्याच्या अन्य साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत असल्याचे पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवशंकर मुंढे यांनी सांगितले. या खून प्रकरणी पोलिसांनी गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे, पप्पू कुडले, रुपेश मारणे, संतोष शेलार, सुनील बनसोडे, सागर रजपुत, गणेश हुंडारे, प्रदीप कंधारे, अनंता कदम, श्रीकांत पवार, बापू बागल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
खून झाल्यानंतर लगेचच तपासासाठी तीन पथके व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पाठवण्यात आले होते. पौड आणि त्या परीसरातील जमिनींच्या व्यवहारांवर कुणाचे वर्चस्व या वादातूक गावडेचा खून झाल्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत. खुनाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश आलेले असले तरीदेखील त्यांचा शोध मात्र कसून सुरु आहे. कोथरुडमध्ये ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सर्च आॅपरेशनमधून फारसे हाती काही लागले नसले तरी मारणेसह गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rural Police in the Cemetery of 'Marne'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.