नारायणगाव : नारायणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांना पुणे जिल्हा परिषदेने सोमवारी निलंबित केले़ हा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी जारी केला आहे़ दरम्यान, सरपंच यांना अपात्र ठरविण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे. खराडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार, याचे सर्वांत प्रथम वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी दिले होते. ते खरे ठरले.खराडे हे नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना ग्रामपंचायत सभावृत्तान्त नोंदवही कोरी ठेवणे, जागा असताना परस्पर नवीन सभावृत्तान्त नोंदवही ठेवणे, ठरावाचा संशयास्पद पद्धतीने सभावृत्तान्त नोंदवहीत समाविष्ट करणे, मासिक कार्यवृत्तान्तामध्ये जमाखर्चाचा तपशील न लिहिणे, भाडेवसुलीसाठी विहित पद्धतीचा अवलंब न करणे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमानता करणे, पुणे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन करण्यास कारणीभूत ठरणे, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग करून खराडे यांनी त्यांच्या सचिवपदाच्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने खराडे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने शंकर व बाळू जाधव यांच्या ताब्यातील गाळ्यावर केलेल्या कारवाईबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी २३ नोव्हेंबर २०१५ रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग नितीन माने यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती़ या समितीने नारायणगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी अहवाल सादर केला होता़.खराडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीनंतर गरजेनुसार विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे, असा स्पष्ट उल्लेख समितीने या अहवालात केला होता. यानुसार उमाप यांनी खराडे यांचे निलंबन केले आहे़ तसेच या अहवालात सरपंच जयश्री मेहेत्रे यांच्यावर अपात्र करणेसंदर्भात ठपका ठेवला असल्याने सरपंच मेहेत्रे यांच्यावरसुद्धा अपात्र म्हणून कारवाई होण्याची शक्यता आहे़ त्या संदर्भातचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार असल्याचे उमाप यांनी सांगितले. (वार्ताहर)१० कर्मचाऱ्यांना अटक नारायणगाव : नारायणगाव ग्रामपंचायतीने शंकर व बाळू जाधव यांच्या गाळ्याचा बेकायदेशीररीत्या ताबा घेण्याच्या प्रकरणावरून नारायणगाव पोलिसांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणी आज नारायणगाव पोलिसांनी दहा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे फरार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
ग्रामविकास अधिकारी निलंबित
By admin | Updated: December 1, 2015 03:32 IST