‘एकमेका साहाय्य करू’च्या सूत्राने ग्रामीण भागात व्यापार
By Admin | Updated: November 14, 2016 02:49 IST2016-11-14T02:49:22+5:302016-11-14T02:49:22+5:30
‘एकमेका साहाय्य करू’च्या सूत्राने ग्रामीण भागात व्यापार

‘एकमेका साहाय्य करू’च्या सूत्राने ग्रामीण भागात व्यापार
पवनानगर : कमी मूल्यांच्या नोटांचा तुटवडा, बँकांमधील नोटा बदलण्यासाठीची गर्दी व बाजारपेठेतील ग्राहकांची आडचण पाहत पवन मावळच्या ग्रामीण भागात ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ अशा पद्धतीने व्यापार सुरू झाला आहे.
आपल्या नेहमीच्या ग्राहकाची अडचण न करता त्यांना आठवड्याच्या क्रेडिटवर माल देणे व्यापाऱ्यांनी सुुरू केले आहे. दूधवाले तर सध्या दररोजचे पैसे न घेता ग्राहकांना दुधाचा पुरवठा करत आहेत. भाजी विक्रेतेही पैशासाठी अडवणूक न करता विश्वासावर उधार देत आहेत. याबाबत काही व्यापारी सांगतात, ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथप्रमाणे देशातील प्रत्येक नागरिकाने आठवडाभर जर अशा पद्धतीने व्यवहार चालवले, तर बँकांमधील गर्दी कमी होऊन बाजारपेठा सुरळीत चालतील. सामान्य नागरिकांचे हाल होणार नाही, याची सामाजिक भान ठेवून काम केल्यास काळ्या पैशाला चाप लावण्यास आपल्यासारख्या सामान्य माणसाची मदत होईल. बाजारपेठेतील व्यापारी व्यवसायातून जमा झालेले पैसे बँकांमध्ये जमा करत आहेत.
पवन मावळमधील शिवणे, चांदखेड, बेबडओहळ, पवनानगर, जवण, कडधे या छोट्या बाजारपेठेत व्यापाराची गती वाढल्याचे जाणवत आहे. हॉटेल व्ययसायावर परिणाम झाला असून, बाजारपेठेतील जास्त रकमेची खरेदी थांबली आहे. मोठे व्यापारी दुकान बंद ठेवून सुटी घेत आहेत.
रोजंदारीवरील छोट्या कामगार वर्गाचे हाल सुरूच आहेत. बँकांमधून चार हजार रुपयांपेक्षा जादा रक्कम मिळत नसल्याने व त्यात दोन हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्याने या मजूर लोकांना २००० रुपयांचे सुटे मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)