दूधखरेदीच्या वरकड खर्चात रुपयाची कपात
By Admin | Updated: September 1, 2014 05:26 IST2014-09-01T05:26:53+5:302014-09-01T05:26:53+5:30
दूधखरेदीच्या वरकड खर्चात उद्यापासून (दि. १ सप्टेंबर) प्रतिलिटरमागे एक रुपयाची कपात करण्याचा निर्णय दूध प्रकल्पांनी घेतला आहे

दूधखरेदीच्या वरकड खर्चात रुपयाची कपात
इंदापूर : दूधखरेदीच्या वरकड खर्चात उद्यापासून (दि. १ सप्टेंबर) प्रतिलिटरमागे एक रुपयाची कपात करण्याचा निर्णय दूध प्रकल्पांनी घेतला आहे, अशी माहिती सोनाई दूध प्रकल्पाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिली.
केंद्र शासनाने निर्यात होणाऱ्या स्किम मिल्क पावडरीकरिता मिळणारे पाच टक्के अनुदान बंद करण्याचा घेतलेला निर्णय, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिकिलो पन्नास ते साठ रुपयांनी घसरलेले स्किम पावडरचे दर, यामुळे दूध प्रकल्पांना प्रतिलिटरमागे पाच ते सहा रुपये तूट सहन करावी लागत आहे.
त्यामुळे नाइलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असे सांगून हीच परिस्थिती बाजारपेठेत कायम राहिली तर पुढच्या दहा ते पंधरा दिवसांत आणखी कपात होण्याची शक्यता आहे, असे माने यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, की ही परिस्थिती आणि मागणी अभावी अन्य दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात शिल्लक असणारे साठे यामुळे दूध प्रकल्प चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, अशी स्थिती झाली आहे. या बाबत विचार विनिमय
करण्यासाठी पुण्यात राज्यातील दूध प्रकल्पांचे अध्यक्ष व अधिकारी वर्गाची बैठक
घेण्यात आली.यावेळ निर्णय घेण्यात आला.
बैठकीस पराग डेअरी मंचर, डायनामिक्स डेअरी बारामती, स्वराज इंडिया फलटण, सोनाई दूध प्रकल्प इंदापूर, गोविंद डेअरी फलटण, वैष्णवी डेअरी सोलापूर व पुणे, कात्रज डेअरी, महानंदा डेअरी, मळगंगा डेअरी या सह अन्य दूध प्रकल्पांचे अध्यक्ष, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)