अखेर 14 वर्षांनी 'रूपाली'ला न्याय मिळालाआरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा; गर्भवतीचे अपहरण करून केली होती हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:25+5:302021-02-05T05:15:25+5:30
पुणे : वासना, क्रूरता जेव्हा माणुसकीवर मात करते तेव्हाच घडू शकते अशी क्रूर घटना पुण्यात २४ वर्षांच्या रुपाली ...

अखेर 14 वर्षांनी 'रूपाली'ला न्याय मिळालाआरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा; गर्भवतीचे अपहरण करून केली होती हत्या
पुणे : वासना, क्रूरता जेव्हा माणुसकीवर मात करते तेव्हाच घडू शकते अशी क्रूर घटना पुण्यात २४ वर्षांच्या रुपाली ढमाले- चव्हाण या विवाहितेसोबत घडली होती.कार्यालयातून घरी येत असताना नेहमीच्या कॅब चालकाने एकतर्फी प्रेमातून तिचे अपहरण करून खून केला. मात्र अखेर १४ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आणि ढमाले कुटुंबीयांना न्याय मिळाला.
ही घटना २ एप्रिल २००७ची. ग्राफिक डिझायनर असलेल्या रुपाली ढमाले-चव्हाण कार्यालयातून काम संपवून बाहेर पडल्या. मात्र घरी पोचल्याच नाहीत. नेहमीच्या कॅबमध्ये त्या बसल्या. त्यांचा कॅबचालक हनुमंत ऊर्फ गणेश धोंडिबा ननावरे आणि त्याचा साथीदार प्रमोद टकले त्यांनी संगनमताने रुपालीची हत्या केली आणि मृतदेह थेट वरंधा घाटात टाकला. त्यांनंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून आरोपी तब्बल दहा दिवस रूपाली यांच्या कुटुंबियांसह त्यांचा शोध घेत असल्याचे नाटक करत होता. अखेर त्याचे आणि रुपाली यांच्या फोनच्या लोकेशन मॅच झाले आणि पोलिसांना आरोपीचा संशय आला. मात्र तरीही हा न्यायालयीन लढा सोपा नव्हता.
रुपाली यांचा मृतदेह बेवारस समजून भोर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले होते. त्यांच्या औषधाच्या गोळ्या आणि दागिन्यांवरून ओळख पटवण्यात आली. याबाबत बोलताना त्यांची बहीण वृषाली ढमाले -राणा म्हणाल्या की,'आम्ही गेल्या 14 वर्षात जे सोसलं ते कोणाच्याही वाट्याला येवू नये, माझी निष्पाप बहिण तर आम्ही गमावलीच मात्र न्यायप्रकियाही संयमाची परीक्षा घेणारी ठरली, पण अखेर सत्याचा विजय झाला आणि रुपालीला न्याय मिळाला'.
रुपाली यांच्या आई लता ढमाले या मात्र भावूक झाल्या होत्या.त्या म्हणाल्या,'रुपाली पाच महिन्यांची गर्भवती होती, काही दिवसात बाळंतपणासाठी माहेरी येणार होती पण त्याआधी हे सगळं घडलं.आजही हे सगळं आठवताना प्रश्न पडतो की इतकी निष्ठुर माणसं जगात असतात का? आरोपीला खरं तर फाशीची शिक्षा व्हायला हवी होती'. रुपालीचा भाऊ रणजित यांनी सांगितले की लॉकडाऊनमध्येही आम्ही पोलिसांची परवानगी घेऊन न्यायालयात जात होतो. आत प्रवेश नव्हता पण प्रवेशद्वारावर तासनतास उभे राहून कामकाज जाणून घ्यायचो.यावेळी त्यांनी सर्व पोलीस अधिकारी व सरकारी वकील उज्वला पवार यांची विशेष मदत झाल्याचे सांगितले'. या निकालामुळे सध्या ढमाले कुटुंब समाधानी असून त्यांनी निकालानंतर पेढे वाटले.
-----------------------
मुलीच्या आठवणी तर कधीही न संपणाऱ्या आहेत, हे घडलं नसतं तर आज मला 14 वर्षांचे नातवंड असते, आमची रुपाली आमच्यात असती पण जर, तरचा विचार आता दूर गेलाय. अनेकांनी या काळात किती कोर्ट कचेऱ्या करणार असं विचारलं, धीर खचलाही काही वेळा. पण मग पुन्हा हिंमतीने आम्ही उभे राहायचो. हे कोणाच्याही मुलीसोबत घडू नये. ही 14 वर्ष वनवासासारखी होती. किमान अशा घटनांत न्यायप्रकिया वेगाने व्हावी असं मला वाटतं.
-ज्ञानोबा ढमाले, रुपाली यांचे वडील