इंदापुरला बंडोबांना थंडोबा करण्यासाठी धावपळ
By Admin | Updated: February 13, 2017 01:29 IST2017-02-13T01:29:30+5:302017-02-13T01:29:30+5:30
यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बंडखोरीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

इंदापुरला बंडोबांना थंडोबा करण्यासाठी धावपळ
इंदापूर : यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत बंडखोरीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधीपदाचा मुकुट कसा काटेरी असतो याचा अनुभव आमदार दत्तात्रय भरणे यांना येत आहे. त्यांच्यापासून ते साध्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण बंडोबांना थंडोबा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.
पळसदेव-बिजवडी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचे अशोक चोरमले व त्यांच्या पत्नी, माळवाडीचे बाळासाहेब व्यवहारे, बाभुळगावचे संजय देवकर, कांदलगावचे प्रवीण बाबर यांची बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसला डोकेदुखीची ठरली आहे. बिजवडी पळसदेव गटात लोणी देवकरचे कार्यकर्ते मंगेश डोंगरे यांची बंडखोरी काँग्रेसला महाग पडेल असे चित्र आहे.
पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटासाठी पै. अशोक चोरमले इच्छुक होते. पक्षाने त्यांना प्रारंभी हिरवा कंदील दाखवला होता. नंतर जिल्हा परिषदेऐवजी पंचायत समितीला संधी देऊ असे आश्वासन देण्यात आले. पडत्या फळाची आज्ञा म्हणून त्यालाही चोरमले यांनी होकार दिला. मात्र, इच्छुकांच्या मुलाखती व इतर सोपस्कार पार पाडले. नंतर ऐन घटकेला, ज्यांनी उमेदवारी मागितली नव्हती, इच्छुकांमध्ये अर्ज नव्हता, अशा शत्रुघ्न शिंदे यांच्या पत्नी- वैशाली शिंदे यांना पक्षाने उमेदवारी दिली. गेल्या पाच वर्षांत पक्षाचे काम करणाऱ्या चोरमले यांना धक्का बसला. त्यांनी जिल्हा परिषदेसाठी स्वत: अपक्ष म्हणून तर बिजवडी गणातून पत्नीस उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
माळवाडीचे बाळासाहेब व्यवहारे हेदेखील राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आहेत. त्यांनीही बिजवडी गणातून उमेदवारी मागितली होती. इतर तीन इच्छुक होते. मात्र त्यांना ही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपमधून आपल्या पत्नीस निवडणुकीस उभे केले आहे. कांदलगाव व बाभुळगाव ही गावे काटी वडापुरी जिल्हा परिषद गटात महत्त्वाची मानली जातात. या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसने अभिजित तांबिले यांना उमेदवारी दिली. अभिजित तांबिले यांचे आजोबा मारुतराव तांबिले अकरा वर्षे पंचायत समिती सदस्य होते. वडील राजेंद्र तांबिले यांनी ही निवडणूक लढवली होती.
आता अभिजित तांबिले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराणेशाही निर्माण करत असल्याच्या समजातून बाभुळगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय देवकर यांनी बंड पुकारले आहे. या आधीच्या निवडणुकीत पक्षाने ज्या वेळी राजेंद्र तांबिले
यांना उमेदवारी दिली होती त्या वेळी तांबिले यांनी
ऐन घटकेला निवडणूक लढवली नाही. त्या वेळी पक्षाने संजय देवकर यांना निवडणूक लढवण्यास सांगितले.
पक्षादेश महत्त्वाचा मानून हारजीतची पर्वा न करता, देवकर यांनी त्या वेळी निवडणूक लढवली. झालेल्या पराभवानंतर गेल्या पाच वर्षात त्यांनी या निवडणुकीची पूर्ण तयारी केली.
आपल्या गावच्या विकासासाठी निधी आणला. निवडणुकीच्या वेळी मात्र उमेदवारी तांबिले यांना मिळाली. हे देवकर यांच्या बंडखोरीचे मुख्य कारण आहे. (वार्ताहर)