रॅगिंगचा तपास अद्याप अपूर्ण
By Admin | Updated: October 27, 2014 03:19 IST2014-10-27T03:19:10+5:302014-10-27T03:19:10+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एमआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती

रॅगिंगचा तपास अद्याप अपूर्ण
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एमआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे महाविद्यालयातील रॅगिंगविरोधी समित्या कागदवरच राहात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातच १५ दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही रॅगिंगचा प्रकार घडण्यास कारणीभूत असलेल्या दोषींपर्यंत पोलिसांना पोहचता आलेले नाही. परिणामी याबाबतचा तपास अद्याप अपूर्णच आहे.
विद्यापीठाने रॅगिंगच्या घटनेची गंभीर दखल घेऊन २४ तासांच्या आत महाविद्यालयाकडून या संदर्भातील अहवाल मागवून घेतला खरा; परंतु विद्यापीठानेसुद्धा या अहवालाचा अभ्यास करून पुढील कोणतीही कार्यवाही केली नाही. विद्यापीठ अनुदान आयोग व विद्यापीठांच्या कायद्यानुसार सर्व महाविद्यालयांनी रॅगिंगविरोधी समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना मुक्तपणे शिक्षण घेता यावे या उद्देशाने योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी ‘अॅण्टी रॅगिंग सेल’च्या माध्यमातून विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु, महाविद्यालयांकडून या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.(प्रतिनिधी)