‘महा-ई-सेवा’ केंद्रातून आता आरटीओचे अर्ज
By Admin | Updated: February 2, 2017 04:02 IST2017-02-02T04:02:01+5:302017-02-02T04:02:01+5:30
परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या मध्यस्थांचा (एजंट) उपद्रव थांबविण्यासाठी परिवहन विभागाचे अर्ज महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून लवकरच सुरू करण्याचा

‘महा-ई-सेवा’ केंद्रातून आता आरटीओचे अर्ज
पुणे : परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर घुटमळणाऱ्या मध्यस्थांचा (एजंट) उपद्रव थांबविण्यासाठी परिवहन विभागाचे अर्ज महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनीच ही माहिती दिली.
परिवहन आयुक्त गेडाम यांनी बुधवारी परिवहन कार्यालयाची झाडाझडती घेतली. यामध्ये नागरिक, संघटना तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिवहन कार्यालयातील कामकाजात सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी त्यांनी काही सूचनाही केल्या. परिवहन आयुक्तांनी सुमारे दीड तास परिवहन कार्यालयातील सर्वच विभागांची माहिती घेतली. दरम्यान, आॅनलाइन पद्धतीने भरण्यात येणारे अर्ज किचकट असल्याने सर्वसामान्य नागरिकांना एजंटांकडे धाव घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेऊन परिवहन विभागातील अर्ज राज्यातील महा-ई-सेवा केंद्रातून भरता येतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे गेडाम यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना आॅनलाइन अर्ज भरताना अनेकदा अडचणी जाणवतात. यामुळे त्यांना मध्यस्तांकडे धाव घ्यावी लागते. सर्वसामान्य नागरिक दलालांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आरटीओचे सर्व अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना अर्ज शुल्काव्यतिरिक्त एका अर्जासाठी २० रुपये सेवा शुल्क द्यावे लागेल. सुरुवातीस दहा प्रकारचे
अर्जच अशा पद्धतीने भरता येतील. त्यानंतर जवळपास सर्वच प्रकारचे अर्ज भरण्याची सोय उपलब्ध होणार
आहे. गेल्या वर्षी १४ डिसेंबर
रोजी त्याबाबतचा निर्णय घेण्यात
आला आहे.
या बैठकीनंतर परिवहन आयुक्तांनी संगम ब्रीज येथील कार्यालयाला भेट देत, येथील कार्यालयातील शिकाऊ परवाना विभागासह इतर सर्व विभागांची पाहणी केली. कामकाजासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणीसंदर्भात विचारणा केली. सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा भाषेत कामकाजासंदर्भातील बोर्ड लावण्याची सूचनादेखील त्यांनी केली. विविध संघटनांच्या सदस्यांनी परिवहन शुल्कातील वाढ मागे घेण्यासंदर्भात मागणी केली. संघटनांची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली असल्याचे गेडाम यांनी सांगितले.
आॅनलाइन प्रणाली लवकरच निर्दोष
आॅनलाइन कामकाजासंदर्भात अजूनही मोठ्या प्रमाणात अडचणी जाणवत आहेत. नव्याने दाखल झालेल्या ४.० प्रणालीमध्येही दोष आहेत. हे दोष दूर करण्यासाठी एनआयसीच्या मुख्य कार्यालयाला कळवण्यात आले आहे. यामुळे आॅनलाइन प्रणालीतील दोष लवकरच दूर होतील, असे आश्वासनही परिवहन आयुक्तांनी दिले.