आरटीआय कार्यकर्त्यांना आवरा...
By Admin | Updated: February 25, 2016 03:57 IST2016-02-25T03:57:57+5:302016-02-25T03:57:57+5:30
माहिती-अधिकाराचा उपयोग होण्याऐवजी वैयक्तिक स्वार्थासाठी काही कार्यकर्ते या अधिकाराचा उपयोग करून घेऊ लागले आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले असून, याबद्दल

आरटीआय कार्यकर्त्यांना आवरा...
पिंपरी : माहिती-अधिकाराचा उपयोग होण्याऐवजी वैयक्तिक स्वार्थासाठी काही कार्यकर्ते या अधिकाराचा उपयोग करून घेऊ लागले आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले असून, याबद्दल काही बोलणेही संकटात टाकू शकते, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
महापालिका, तसेच अन्य शासकीय कार्यालयांमध्ये वेळोवेळी माहिती अधिकारांतर्गत अर्ज देऊन विविध प्रकारची माहिती मागवली जाते. विकास प्रकल्पाचे काम करणारे ठेकेदार, प्रकल्पावर झालेला खर्च अशा स्वरूपाची माहिती प्रामुख्याने मागवली जाते. अधिकारी, कर्मचारी अडचणीत येतील, अशा पद्धतीने माहिती मागवून त्यांच्या मागे ससेमिरा लावणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे. काही कार्यकर्ते माहिती मागवून वृत्तपत्रांना देतात. त्या माहितीच्या आधारे बातम्या येतात. परंतु काही कार्यकर्ते केवळ माहिती मागवतात. त्या मिळविलेल्या माहितीचे काय करतात, हे कोणाला समजू देत नाहीत. वैयक्तिक कामासाठी, न्यायालयीन कामकाजात पुराव्यादाखल काही महत्त्वाचे कागदपत्र जमा करताना, माहिती अधिकार कायद्याचा वापर केला जातो. त्यात गैर नाही, परंतु अधिकाऱ्यांना अडचणीत आणायचे याच उद्देशाने माहिती अधिकार कायद्याचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर घालणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
काही कार्यकर्ते तर संबंधित अधिकारी शासकीय सेवेत रुजू कधी झाला, त्याचे शिक्षण, व्यावसायिक पात्रता, मिळालेल्या बढत्या अशा स्वरूपाची वैयक्तिक माहिती मागवतात. त्यामागे वेगळाच उद्देश असतो. जमीन खरेदी-विक्री संबंधीची माहिती मागविणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. ज्या शासकीय कार्यालयांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण होते, दलालांचा सुळसुळाट आहे, अशा कार्यालयांची माहिती मागविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. (प्रतिनिधी)
...काहींचे उपजीविकेचे साधन
माहिती अधिकार कायद्यांतर्गत सातत्याने विविध प्रकारची माहिती मागविणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी हे काम उपजीविकेचे साधन केले आहे. कसलेही काम न करता केवळ सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्यांना माहिती अधिकार कायदा पैसे कमावण्यासाठी उपयुक्त ठरू लागला आहे.
महानगरांपासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत माहिती अधिकार कार्यकर्ते सक्रिय आहेत. अधिकाऱ्यांवर वचक बसून चुकीच्या कामांना अटकाव व्हावा, जनतेच्या कररूपाने जमा होणाऱ्या निधीचा शासकीय स्तरावर योग्य विनियोग व्हावा, या दृष्टीने माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून काम होणे अपेक्षित आहे, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
पैसे कमाविण्यासाठी काहीजण माहिती अधिकार कायद्याचा वापर करू लागले असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. अशा लोकांना वेळीच आवर घालावा लागणार आहे. अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार असोसिएशनचे सदस्य असलेले अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात चांगले काम करतात. असे चुकीचे काम करताना कोणी आढळृून आल्यास असोसिएशनतर्फे त्याच्यावर कारवाई केली जाते. शहरात असे कोणी चुकीच्या पद्धतीने माहिती अधिकाराचा वापर स्वार्थासाठी करीत असेल, तर कळवावे, त्याची राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार देण्यास असोसिएशन पुढाकार घेईल.
- रामदास जंगम, अध्यक्ष,
अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार असोसिएशन