आरटीई प्रवेशास मुदतवाढ
By Admin | Updated: March 15, 2017 03:40 IST2017-03-15T03:40:58+5:302017-03-15T03:40:58+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी दि. १८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे

आरटीई प्रवेशास मुदतवाढ
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी दि. १८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे अद्याप पाल्याचा प्रवेश न घेतलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशाबाबत पालक उदासीन असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे १२ हजारांपैकी केवळ ३४०० प्रवेश निश्चित झाले आहेत.
राज्यात सर्व जिल्ह्यांत ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. आलेल्या प्रवेश अर्जांमधून लॉटरी पद्धतीने प्रवेशास पात्र ठरलेल्या मुलांच्या प्रवेशासाठी काही जिल्ह्यांमध्ये दि. १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तीन दिवस आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पालकांनी प्रवेशाची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. विद्यार्थीहित लक्षात घेऊन पहिल्या लॉटरीतून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत दि. १८ मार्चपर्यंत वाढविण्यात येत आहे, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रवेशासाठी पात्र ठरूनही हजारो प्रवेश अद्याप झाले नसल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ८४९ शाळांमध्ये १५ हजार ६९३ आरटीईची प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी ३६ हजार ९३३ अर्ज आले आहेत. पहिल्या लॉटरीमध्ये त्यापैकी १२ हजार २४३ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी दि. ६ मार्चपासून सुरुवात झाली. आधीच्या वेळापत्रकानुसार प्रवेशाची अंतिम मुदत दि. १५ मार्चपर्यंत होती. तरीही दि. १४ मार्चपर्यंत केवळ ३ हजार ४१४ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत. अद्यापही ८ हजार ८२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित नाहीत. प्रवेशाची मुदत वाढविण्यात आल्याने त्यामध्ये कितपत वाढ होईल, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.