‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया आठवड्याभरात सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:11+5:302021-06-09T04:14:11+5:30

राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ ...

The RTE admission process will begin within a week | ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया आठवड्याभरात सुरू होणार

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया आठवड्याभरात सुरू होणार

राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ लाख २२ हजार ५८४ विद्यार्थ्यांमधून ऑनलाइन लॉटरी पद्धतीने ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या दोन महिन्यात बहुतांश जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र होते. शाळांमध्ये गर्दी झाल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका होता. त्यामुळे शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले नव्हते. मात्र, काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागानेसुद्धा आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी एसएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. मात्र, बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश मिळूनही ऑनलाइन शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले होते. परंतु, प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होईल, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शाळास्तरावर कागदपत्रांची पाहणी करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. या वर्षीसुद्धा त्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. परंतु, काही संस्थाचालकांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

------------------

येत्या आठवड्याभरात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही शाळास्तरावर प्रवेश देण्याची प्रक्रिया राबविण्याबाबत शिक्षण विभागाकडून आवश्यक सूचना दिल्या जातील.

- दिनकर टेमकर ,सहसंचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

---------

आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेले विद्यार्थी

जिल्हा जागा प्राप्त अर्ज लॉटरीतून मिळलेले प्रवेश

पुणे १४,७७३. ५५,८१३ १४,५७६

मुंबई ५,२२७ १२,९११ ३,८२५

नाशिक ४,५४४ १३,३३० ४,२०८

नागपूर ५,७२९ २४,१६७ ५,६११

ठाणे १२,०७४ १८,९५६ ९,०८८

जळगाव ३,०५६. ५,९३९ २,६९२

औरंगाबाद ३,६२५ ११,८१६ ३,४७०

जालना २,२६२ ३,५८४ १,९१८

नांदेड १,७२० ५,३१८ १,६०४

यवतमाळ १,२७५ ३,३९३. १,१५१

बीड २,२२१ ३,९३८. २,०१२

भंडारा ७९१ २,०५१ ७८४

अकोला १,९६० ४,७७ १,८१७

अहमदनगर ३०१३ ४,८२५ २,७५३

सोलापूर २,२३१ ४,२५२ १,७३८

कोल्हापूर ३,१८१ २,६४५ २,१३७

सातारा १,९१६ २,५०० १,५९५

सांगली १,६६७ १,४४६ ९८९

Web Title: The RTE admission process will begin within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.