रो हाऊस भोवले, ग्राहक मंचाचा व्यावसायिकास दणका
By Admin | Updated: July 7, 2015 04:34 IST2015-07-07T04:34:48+5:302015-07-07T04:34:48+5:30
खेड-शिवापूर येथे ६ लाखांत रो हाऊस विकण्याचे आमिष दाखवून त्यातील ३ लाख रुपये घेऊनही रो-हाऊस न देऊन उलट जमिनीच्या परस्परविक्रीचा घाट घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक मंचाने फटकारले.

रो हाऊस भोवले, ग्राहक मंचाचा व्यावसायिकास दणका
पुणे : खेड-शिवापूर येथे ६ लाखांत रो हाऊस विकण्याचे आमिष दाखवून त्यातील ३ लाख रुपये घेऊनही रो-हाऊस न देऊन उलट जमिनीच्या परस्परविक्रीचा घाट घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक मंचाने फटकारले. बांधकाम व्यावसायिकाने ३ लाख ३० हजार रुपये, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासापोटी १ लाख रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून १ हजार रुपये देण्याचे मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य क्षितिजा कुलकर्णी यांनी आदेश दिले.
अर्चना चेतन अंकलकोटे (रा. श्रीधरनगर साईकृपा सोसायटी, प्लॉट नं. ६१, धनकवडी) यांनी तक्रार दाखल केली होती. कल्याणी डेव्हलपर्सचे प्राची अजय भुते, अजय गोविंद भुते व पॅरामाऊंट रिअॅलिटीजचे सचिन मुकुंद जगताप, मधुर सुरेश भोसले, साईप्रभा गोविंद मेनन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याणी डेव्हलपर्स आणि पॅरामाऊंट रिअॅलिटीज अशी बांधकाम कंपनी स्थापन करण्यात आली. त्यांनी ‘शांती होम’ नावाने रो हाऊस स्कीम जाहीर केली. अंकलकोटे यांनी ३ लाख ३० हजार रुपये दिले. बांधकाम कंपनीने रो हाऊस विकण्याच्या आमिषाने रक्कम गोळा केली; परंतु रो हाऊस बांधून दिलेच नाही. उलट, या जागेवर अर्धवट बांधकाम करून परस्पर विकण्याचा घाट घातला. यासंबंधी त्यांनी दैनिकातून जाहीर नोटीसही प्रसिद्ध केली. त्यामुळे त्यांनी ही तक्रार केली.
बांधकाम कंपनीने लेखी जबाब दाखल करून तक्रारदारांचे मुद्दे नाकारले. मंचाने दोन्ही पक्षांच्या कागदपत्रांचे अवलोकन केले. रो हाऊस खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असून, रो हाऊस दिले नाही व रक्कमही परत केली नाही. यावरून निकृष्ट सेवा दिसत आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे मंचाने बांधकाम कंपनीच्या पाचही जणांनी वैयक्तिकरीत्या आणि संयुक्तरीत्या ३ लाख ३० हजार रुपये परत करावेत, तसेच नुकसानभरपाई म्हणून १ लाख रुपये, तर तक्रारीचा खर्च म्हणून १ हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला.