नदीपात्राला छावणीचे स्वरूप
By Admin | Updated: August 8, 2015 00:57 IST2015-08-08T00:57:55+5:302015-08-08T00:57:55+5:30
विठ्ठलवाडी ते वारजेदरम्यानच्या नदीपात्रातील रस्ता काढण्यास सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी जोरदार विरोध केला. मात्र, गुरुवारी (दि. ६) झालेला विरोध लक्षात घेऊन पोलीस तसेच महापालिकेकडून

नदीपात्राला छावणीचे स्वरूप
पुणे : विठ्ठलवाडी ते वारजेदरम्यानच्या नदीपात्रातील रस्ता काढण्यास सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी जोरदार विरोध केला. मात्र, गुरुवारी (दि. ६) झालेला विरोध लक्षात घेऊन पोलीस तसेच महापालिकेकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत रस्ता उखडण्याची कारवाई सुरूच ठेवण्यात आली. दरम्यान, नागरिकांनी तीव विरोध केल्यानंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आंदोलकांची भेट घेत वस्तुस्थिती सांगितली. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार, हे काम सुरू असल्याने ते थांबविता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर महापलिकेकडून दुपारनंतर पुन्हा रस्ता उखडण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग ठरणाऱ्या विठ्ठलवाडी ते वारजेदरम्यान पालिकेने बांधलेल्या नदीपात्रातील रस्त्याला पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) आणि सुप्रीम कोर्टाने हा रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गुरुवारपासून पालिकेने हा रस्ता उखडण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी नागरिकांच्या विरोधामुळे रात्री उशिरा हे काम करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी महापालिकेचे पथक कारवाईसाठी पोहोचताच कारवाईच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून या परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जमण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवसेना, भाजप तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या नागरिकांसमवेत रस्त्यावर बसूनच धरणे आंदोलन सुरू केले. हा रस्ता काढल्याने वारजे पुलाच्या बाजूकडील सोसायट्यांना ये-जा करण्यासाठी रस्ताच उरणार नाही. तसेच अनेक सोसायट्या थेट नदीपात्रात येतील, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचे काम सुरू असून, तोपर्यंत महापालिकेने रस्ता उखडून टाकू नये, अशी मागणीही नागरिकांनी या वेळी करत काम रोखून धरले. अखेर, दुपारी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी आंदोलनकर्त्या नागरिकांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे काम करणे आवश्यक असल्याचे सांगत ते थांबविता येणार नसल्याची वस्तुस्थिती महापौर तसेच आयुक्तांनी आंदोलनकर्ते नागरिक तसेच राजकीय पक्षांच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडत, कारवाई थांबविता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)