आरोग्य केंद्राचे छत कोसळले
By Admin | Updated: January 14, 2016 03:50 IST2016-01-14T03:50:39+5:302016-01-14T03:50:39+5:30
बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छत कोसळून दोन रुग्ण गंभीर जखमी झाले. बुधवारी (दि. १३) दुपारी ही दुर्घटना घडली.

आरोग्य केंद्राचे छत कोसळले
लोणी भापकर : बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छत कोसळून दोन रुग्ण गंभीर जखमी झाले. बुधवारी (दि. १३) दुपारी ही दुर्घटना घडली.
गजानन गणपत भापकर (वय ४८, रा. लोणीभापकर) व मुढाळे येथील मजूर महिला विमल गुलाब बाबर (वय ५५ ,रा. मुढाळे) हे गंभीर जखमी झाले.
चौदा वर्षांपूर्वी बांधकाम, तर सात वर्षांपूर्वी दुरुस्ती केलेल्या या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची सतत चर्चा होत राहिली. परंतु, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे काणाडोळा करण्याची भूमिका घेतली.
आज रुग्णांच्या जिवावर बेतण्याचा प्रसंग उद्भवल्याने ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तालुक्याच्या जिरायती भागातील लोणीभापकर ते कऱ्हावागज या मोठ्या पट्ट्यातील लोकसंख्येसाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्यसेवा पुरविली जाते. सन २००२ मध्ये या केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासूनच येथील बांधकामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थ तक्रारी करीत आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्याची खंत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
जखमींना तातडीने बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकारानंतर सध्या इमारतीच्या छताचे लोखंड उघडे पडल्याचे जागोजागी दिसत आहे.
अनेक ठिकाणी छताचा भाग खाली आल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र आहे. येथील सेवा उघड्यावर पडल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)