छत कोसळून एक ठार
By Admin | Updated: January 26, 2015 01:47 IST2015-01-26T01:47:37+5:302015-01-26T01:47:37+5:30
बंद कंपनीमध्ये लोखंडी जुने शेड काढताना आधारात तुटल्याने छत आणि भिंतीचा काही भाग कोसळून एक जण ठार झाला असून,

छत कोसळून एक ठार
पिंपरी : बंद कंपनीमध्ये लोखंडी जुने शेड काढताना आधारात तुटल्याने छत आणि भिंतीचा काही भाग कोसळून एक जण ठार झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना भोसरी एमआयडीसीत रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
या घटनेत साईनाथ गोविंद गाजनकर (रा. भोसरी) हा मजूर ठार झाला, तर एन. टी. कारखानीस (रा. चिंचवडगाव), देवराम दिघे (रा. सांगवी), ज्ञानेश्वर यादव (रा. लोहगाव) हे तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एमआयडीसी, भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टीला लागून जे-३२६ ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल फोरम कार्यालयाजवळच्या स्मॅश एन्टरप्रायजेस कंपनी असून, सध्या ती बंद आहे. जुन्या मालकाने ती दुसऱ्याला चालविण्यास दिली आहे. त्यामुळे कंपनीचे नूतनीकरण सुरू केले होते. शेडमधील भिंत काढण्याचे काम २ दिवसांपासून सुरू होते. ७ ते ८ मजूर हे काम करीत होते. शेडचा मधला आधाराच निघाल्याने हे अवजड शेड कोसळले. त्यात भिंतीचा काही भागही कोसळला. त्यामध्ये गाजनकर यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. कारखानीस, दिघे, यादव हेही जखमी झाले. इतर मजूर सुदैवाने बचावले.
खबर मिळताच भोसरी व संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्या पाठोपाठ एमआयडीसी आणि भोसरी ठाण्याचे पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी शेड आणि भितींच्या ढिगारात शोध घेऊन अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. त्यातील एक जण जागीच ठार झाला होता. जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. गाजनकर यांच्या नातेवाइकांनी वायसीएम शवविच्छेदनगृहाबाहेर गोंधळ घातला. जमाव शांत झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंदविला आहे.