रोहिडेश्वर बचत गटाने केली आठ टन सेंद्रिय गांडूळखताची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:17+5:302021-07-14T04:14:17+5:30
शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. बचत गटाने तीन महिन्यांत आठ टन गांडूळखताची निर्मिती करुन ...

रोहिडेश्वर बचत गटाने केली आठ टन सेंद्रिय गांडूळखताची निर्मिती
शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. बचत गटाने तीन महिन्यांत आठ टन गांडूळखताची निर्मिती करुन टनाला १० हजारप्रमाणे तीन टन खताची विक्री करुन ३० हजार रु उत्पन्न मिळाले आहे.
गोदरेज कंपनीच्या सहकार्याने, अवार्ड संस्था सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारवाडी (ता. भोर) येथील रोहिडेश्वर शेतकरी बचत गटाच्या व ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उभारलेल्या सेंद्रिय गांडूळखत निर्मिती प्रकल्पातून तयार झालेल्या खताचे उद्घाटन गोदरेज अप्लायन्सेस कंपनीचे प्लान्ट्स प्रमुख सुनील बेलोसे, गोदरेज सीएसआर प्रमुख अश्विनी देव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्पोरेट सीएस आर मॅनेजर प्रफुल्ल मोरे, एचआर हेड संदीप फुके, फायनान्स हेड सुधीर तळेकर, अवार्ड संस्था साताराचे प्रमुख किरण कदम, ॲड. नीलिमा कदम, संतोष धुमाळ, तुषार शिंदे, सरपंच सीताबाई गुरव, उपसरपंच मोहन मानकर, सदस्य उत्तम खोपडे, ज्ञानेश्वर शिंदे, सदस्या रुपाली जाधव, कृषि अधिकारी शरद सावंत, तालुका तंत्र व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषी सहायक जे. व्ही. भोसले उपस्थित होते.
याबाबत प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक आनंदा शिंदे म्हणाले की, मागील तीन महिन्यांत या प्रकल्पातून आठ टन गांडूळ खतनिर्मिती झाल्याचे व त्यापैकी तीन टन विक्री करून ३० हजार रु. उत्पन्न मिळाले असून, तीन टन खताची विक्री बाकी असून, उर्वरित दोन टन खत या गटातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीसाठी तयार करून ठेवले.
खत निर्मिती करणे व त्यातून सेंद्रिय तयार करून ते ग्राहकापर्यंत पोचवण्याचा, ग्राहकांचा विश्वास संपादन करून व्यवसाय वृद्धी गटाचा ब्रँड करण्याचा पुढील मानस असल्याचा या रोहिडेश्वर शेतकरी गटाने सांगितला. अशा प्रकारच्या प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहन कृषी विभाग व गोदरेज सीएसआर यांच्या वतीने करण्यात आले.
--
कोट
रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत कमी होत असताना याचा उत्पादनक्षमता, निकृष्ट दर्जाचे धान्य व त्याचा मानवी जीवनावर घातक परिणाम होतो. यावर शाश्वत उपाय म्हणजे विषमुक्त सेंद्रिय शेती आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती करुन आरोग्याची काळजी घ्यावी.
सुनील बेलोसे
--
१३ भोर गांडूळखत
बाजारवाडी (ता. भोर) येथे रोहिडेश्वर बचत गटाने तयार केलेल्या गांडूळखत निर्मितीचे उद्घाटन करताना शेतकरी.