‘रॉकिंग’ इंडियन ओशन..!
By Admin | Updated: January 23, 2017 03:20 IST2017-01-23T03:20:57+5:302017-01-23T03:20:57+5:30
ज्या रॉक बँडचे तरुणाईच्या मनावर गारुड आहे, त्या ‘इंडियन ओशन’चा ‘रॉकिंग’ परफॉर्मन्स वसंतोत्सवाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच

‘रॉकिंग’ इंडियन ओशन..!
पुणे : ज्या रॉक बँडचे तरुणाईच्या मनावर गारुड आहे, त्या ‘इंडियन ओशन’चा ‘रॉकिंग’ परफॉर्मन्स वसंतोत्सवाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच झाला. आणि तरुणाई अक्षरश: बेफाम झाली. मोहनवीणा, गिटार, ड्रम्स, तबला या वाद्यांच्या मिश्रणातून इंडो फ्यूजनचा जबरदस्त आविष्कार सादर झाला. सुरांमधून हृदयरूपी संवाद घडवीत या बँडने सर्वांनाच खिळवून ठेवले. शेवटच्या टप्प्यात ‘गुबगुबी’ या कर्नाटक वाद्याच्या तालावर रंगलेल्या जुगलबंदीने कळसाध्याय गाठला आणि या अविस्मरणीय सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडटात मानवंदना देण्यात आली.
तीन दिवस रंगलेल्या भारतीय अभिजात संगीताच्या वसंतोत्सवात खऱ्या अर्थाने बहार आणली या ‘इंडियन ओशन’च्या सादरीकरणाने. शास्त्रीय संगीताच्या या मैफलीत बँडचा थक्क करणारा आविष्कार अनुभवण्यासाठी तरुणांची महोत्सवाला विशेष गर्दी झाली होती. गिटारिस्ट राहुल राम, तुहीन चक्रवर्ती, अमित खिलानी या इंडियन ओशनच्या बँडने रंगमंचावर पाऊल ठेवताच टाळ्यांचा कडकडाट झाला. एकीकडे गिटार, ड्रम्स ही पाश्चात्य वाद्ये आणि दुसरीकडे तबला आणि मोहनवीणा यांसारखी पारंपरिक वाद्ये यांच्या जुगलबंदीतून ताल-सुरांचा अनोखा नजराणा पेश झाला. जॅझ आणि भारतीय रॉक संगीत हे या बँडचे वैशिष्ट्य! ‘बंदे’, कन्निसा’ या त्यांच्या अल्बमने इतिहास रचला. याचेच सादरीकरण करण्याची विनंती रसिकांकडून होत होती. मात्र त्यांनी कन्नड गीताच्या सुरावटीतून एक वेगळीच वातावरणनिर्मिती केली. कर्नाटक ‘गुबगुबी’ या वाद्याचा वापर करून नर्मदाकिनारी जे गीत सादर केले जाते, त्याची झलक त्यांनी पेश केली. आणि त्या सुरांमध्ये रसिक हरवून गेले. ‘ब्लॅक फ्रायडे’मधील ‘बंदे’ या गीताने सर्वांची मने जिंकली. पं. विश्वमोहन भट यांची मोहनवीणा, राहुल राम यांची गिटार यांच्या बरोबरीला ड्रम्स, तबला, डफ आणि गुबगुबी या वाद्यांची जुगलबंदी चांगलीच रंगली. एकलवादनात पं. विश्वमोहन भट यांनी श्याम कल्याणच्या सुरावटीतून मोहनवीणेच्या तारा छेडल्या.
प्रारंभी पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांच्या बहारदार सादरीकरणाने झाली. अभ्यासपूर्ण गायकी, आलापी फिरकती आणि तानांमधून त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. ‘येरी आली पिया बिन’ ही बंदिश त्यांनी खुलवली. तराण्याचे सादरीकरण करून मिश्र खमाजमधील पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ‘मैं कैसे आऊ बालमा रे’ ही पंडितजींची ठुमरी सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या अभिजात कंठस्वरांची तृष्णा शमत नव्हती. त्यामुळे रसिक एकेक फर्माइशींची आलापी आळवीत होते, भाटे यांनी जोहार मायबाप हे भजन सादर केल्यानंतर त्यांना नाट्यसंगीताची फर्माईश केली गेली. अखेर रसिकांच्या विनंतीला मान देत त्यांनी ‘नरवर कृष्णसमान’ हे पद सादर करून रसिकांची अभिजाततेची तृष्णा भागवली. (प्रतिनिधी)