महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: May 23, 2015 23:21 IST2015-05-23T23:21:24+5:302015-05-23T23:21:24+5:30
बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर टेम्पोचालकाला अडवून माराहाण करीत लुटणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी महामार्गाची नाकाबंदी करीत ताब्यात घेतले आहे.

महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद
बारामती : बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर टेम्पोचालकाला अडवून माराहाण करीत लुटणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी महामार्गाची नाकाबंदी करीत ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात टेम्पोचालक, किशोर पांचाळ (वय २३, रा. येनपुरे, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी स्वप्निल अनिल तांदळे (वय २३), संतोष शिवाजी शिंदे (वय २५, रा. पिंपळी, ता. बारामती), नितीन भानुदास भोईटे (वय २३, रा. निंबोडी, ता. इंदापूर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चालक किशोर पांचाळ हा शनिवारी (दि. २२ मे) रोजी सहकाऱ्यासह टेम्पो (एम. एच. २५, यु. ०४२३) घेऊन निघाला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळी गावाच्या हद्दीत आरोपींना पांचाळ यांच्या टेम्पोला चारचाकी कार (एम. एच. ४२, के. ६७७) आडवी लावली. पांचाळ यांना दमदाटी करीत मारहाण केली. त्या वेळी पांचाळ यांचा साथीदार भीतीने पळाला व शेजारील उसाच्या शेतात लपला. आरोपींनी पांचाळ यांच्याजवळील १३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पोतील टेप, असा एकूण १६ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरला. तसेच, आरोपींनी टेम्पोची काचही फोडली.
दरम्यान, पांचाळ यांच्या सहकाऱ्याने १०० क्रमांकावर फोन करीत घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. बारामती शहर पोलिसांनी तातडीने पावले उचलत महामार्गाची नाकाबंदी केली. आरोपींना अटक करत त्यांच्याजवळील १६ हजार ५०० रुपये किमतीचा माल हस्तगत केला. तसेच, गुन्ह्यात वापरलेली चारचाकीही ताब्यात घेण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान, जी. पी. संकपाळ, पोलीस कर्मचारी रमेश कोकणे, बाळाइथसाहेब पानसरे, कल्याण खांडेकर, सुधीर काळे, दशरथ कोळेकर, नितीन बोऱ्हाडे, जालिंदर जाधव, पोपट नाळे, चालक व्यवहारे, बंडगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. (वार्ताहर)
पौड : वीजपंप चोरणारी टोळी पौड पोलीसांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यातच १७ मे रोजी करमोळी येथील शेतकरी हनुमंत ज्ञानेश्वर केदारी यांनी आपल्या शेतातील बोअरवेलमध्ये बसवलेला सबमर्सिबल पंप व त्याचे वायर, स्वीच चोरून नेल्याची तक्रार पौड पोलीस चौकीला दाखल झाली.
डी.बी. पथकाचे सहायक फौजदार फाजगे यांच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे व पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासात करमोळी (ता. मुळशी) येथीलच संशयित आरोपी संतोष ज्ञानेश्वर केदारी (वय ३७) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने व त्याचे अन्य दोन साथीदार राजेंद्र दत्तात्रय केदारी, रा. करमोळी (वय-२६) व श्रीरंग पंढरीनाथ मारणे (वय ३७) यांच्या मदतीने चोरी केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे यातील श्रीरंग मारणे याचा पौड येथे शेती विद्युत पंप विक्री व दुरुस्तीचा अनेक वर्षांपासूनचा सर्वपरिचित व्यवसाय आहे.
गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक व्ही. एच. पवार, स. पो. फौजदार प्रदीप फाजगे, चालक वसंत आंब्रे, रमेश वाघवले, महेंद्र वाळुंजकर, शंकर नवले, देविदास चाकणे, मयूर निंबाळकर, नाना मदने, यांनी महत्त्वाची कामगिरी केली. पुढील तपास व्ही. एच. पवार हे करीत आहेत.
या घटनेमुळे विद्युत पंप विक्रेताच चोर निघाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे. वरील आरोपींना पौड पोलिसांनी दि. १७ रोजी अटक करून न्यायालयाकडून दि. २० पर्यंत पोलीस कोठडी घेऊन अधिक तपास केला. आरोपींनी बावधन येथील दीपक चंद्रकांत कोकाटे व पौड येथील शेतकरी अंकुश भाऊसाहेब वाघवले यांच्याही शेतातील पंप व अन्य साहित्य चोरून नेल्याचे उघड झाले.
या गुन्ह्यातील विद्युत पंप व त्याबरोबर चोरी केलेला एकूण ४,७३,३५० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्याने सदर आरोपींची मोठी टोळी असल्याचे व त्यांनी अन्यही ठिकाणी अशाच चोऱ्या केल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींनी या चोरीकामी वापरलेली मोटारसायकल, अल्टो के १० कार, व टाटा झीप टेम्पो ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.