नदीपात्रातील रस्ता अखेर उखडला
By Admin | Updated: August 7, 2015 00:25 IST2015-08-07T00:25:40+5:302015-08-07T00:25:40+5:30
सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजे हा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता नदीपात्रातून तयार करण्यात आला होता

नदीपात्रातील रस्ता अखेर उखडला
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजे हा तब्बल दोन किलोमीटरचा रस्ता नदीपात्रातून तयार करण्यात आला होता. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक नागरिकांचा विरोध मोडून काढत अखेर महापालिकेने हा रस्ता उखडण्यास सुरुवात केली.
वारजे पुलाच्या बाजूने हे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले असून, या कामास विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या ९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही दोन वेळा नागरिकांनी रस्ता काढण्यास विरोध केल्याने महापालिकेस परत फिरावे लागले होते. मात्र, हा रस्ता काढण्यासाठीची मुदत आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात संपत असल्याने पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजेदरम्यान नदीपात्रात ब्लूू लाइनमध्ये भराव टाकून बांधलेल्या रस्त्याला पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेत, त्याविरोधात एनजीटीकडे धाव घेतली होती. एनजीटीने हा रस्ता उखडण्याचे आदेश पालिकेला दिले होते; पण पालिकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने एनजीटीचा निर्णय कायम ठेवत, पालिकेला रस्ता उखडण्यासाठी जादा मुदत दिली. हा रस्ता उखडण्यासाठी पालिकेने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रयत्न केले होते. प्रत्येक वेळी स्थानिक नागरिकांनी पालिकेचे जेसीबी आणि अधिकाऱ्यांना रस्ता उखडण्यापासून विरोध केला होता. तर एकदा धक्काबुक्कीही झाली होती.
न्यायालयाची मुदत पुढील आठवड्यात संपणार आहे. तत्पूर्वी, रस्ता उखडण्याच्या कामाला सुरुवात होणे आवश्यक असल्याने गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पालिकेचे पथक पुन्हा नदीपात्रात दाखल झाले. या परिसरातील महिलांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पथकासमोरच ठाण मांडून रस्ता उखडू देणार नाही, असा पवित्रा घेतला. या वेळी आमदार भीमराव तापकीर यांच्यासह छत्रपती संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर गोसावी कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे सहा तासांहून अधिक काळ आंदोलक भूमिकेवर ठाम होते. कोणताच तोडगा निघत नसल्याचे लक्षात आल्यावर पालिकेचे पथ विभागप्रमुख विवेक खरवडकर घटनास्थळी दाखल झाले.