हिंजवडीतील रस्ता दुरुस्त
By Admin | Updated: June 17, 2015 00:56 IST2015-06-17T00:56:55+5:302015-06-17T00:56:55+5:30
वर्दळीच्या वाकड-हिंजवडी रस्त्यालगत भूमिगत केबल गाडण्यासाठी केलेले खोदकाम बुजविण्याचे रखडलेले काम लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तत्काळ मार्गी लागले आहे.

हिंजवडीतील रस्ता दुरुस्त
पिंपरी : वर्दळीच्या वाकड-हिंजवडी रस्त्यालगत भूमिगत केबल गाडण्यासाठी केलेले खोदकाम बुजविण्याचे रखडलेले काम लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तत्काळ मार्गी लागले आहे. अडथळा दूर झाल्याने आयटी पार्कमधील अभियंत्यांना दिलासा मिळाला असून, वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. मुख्य रस्त्यालगतच हिंजवडीच्या हद्दीत दूरध्वनी व इंटरनेची भूमिगत केबल गाडण्यासाठी खासगी मोबाईल कंपन्यांनी महिन्यात दोनदा रस्ता खोदला होता. मात्र, बऱ्याच दिवसांपासून हे काम रेंगाळत ठेवल्याने व भर वर्दळीच्या वेळीच काम सुरू ठेवण्याच्या प्रकारामुळे वाहतुुकीस मोठा अडथळा होत होता. जुन्या उपनिबंधक कार्यालयासमोर अनेक ठिकाणी हे अर्धवट ठेवलेले काम धोक्याचे ठरत होते. अचानक वाहने थांबवावी लागल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक बसून किरकोळ अपघात वाढले होते. कधीही मोठी दुर्घटना होईल, अशी परिस्थिती होती. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न अधिकच बिकट झाला होता. एमआयडीसीच्या अखत्यारित असणाऱ्या या रस्त्यावरील कामाच्या नियोजनाबाबत प्रशासनाने गलथानपणा दाखविल्यासारखी परिस्थिती होती. याबाबत लोकमतच्या १३ जूनच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित दूरध्वनी कंपनीने रखडलेले हे काम तत्काळ पूर्ण केले आहे. केबल गाडून खड्ड्यांवर झाकणे बसविली आहेत. त्यामुळे आता आयटी पार्कच्या तिन्ही टप्प्यांकडे जाणाऱ्या अभियंत्यांच्या वाहनांसाठी मार्ग उपलब्ध झाला आहे. (प्रतिनिधी) वाहतूक पोलिसांनी टाकला सुटकेचा नि:श्वास - मागील पंधरा दिवसांपासून रखडलेल्या केबलच्या कामामुळे आयटी पार्कच्या या रस्त्यावर अडथळा होऊन दररोजच्या वाहतूककोंडीत वीस मिनिटांचा अधिकची भर पडू लागली. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होत होता. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सदर ठिकाणी खास ३ वाहतूूक पोलीस तैनात करावे लागत होते. मात्र, लोकमतच्या वृत्तानंतर या ठिकाणी मार्ग मोकळा झाल्याने वाहने जाण्यास भरपूर जागा उपलब्ध झाली आहे. वाहतूक पोलिसांना व्यापातून दिलासा मिळाला आहे. येथून आता पादचाऱ्यांनाही चालण्याइतपत जागा उपलब्ध झाली आहे.