रस्ते खोदाईची डेडलाइन नावालाच
By Admin | Updated: June 1, 2015 05:36 IST2015-06-01T05:36:27+5:302015-06-01T05:36:27+5:30
शहरातील सर्व खोदाईची कामे ३१ मेअखेर पर्यंत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार,

रस्ते खोदाईची डेडलाइन नावालाच
पुणे : शहरातील सर्व खोदाईची कामे ३१ मेअखेर पर्यंत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे, आयुक्त कुणाल कुमार, सभागृह नेते बंडू केमसे यांनी बैठकांवर बैठका घेऊन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्याला मुदतवाढ देऊन खोदाईची कामे सुरूच ठेवली आहेत. महावितरण, सीसीटीव्ही, पाणीपुरवठा आणि एमएनजीएलच्या खोदाईस मुदतवाढ देण्यात आली आहे.
पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खडड्े पडून त्याचा प्रचंड त्रास दरवर्षी पुणेकरांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदाईची कामे संपवू असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जाते; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. रस्ते खोदाईची सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत बंद करणे आवश्यक असताना, महावितरण, सीसीटीव्ही, पाणीपुरवठा आणि एमएनजीएलला अधिकृतपणे मुदतवाढ प्रशासनाने दिली आहे. मुख्य रस्त्यांवरील खोदाईची कामे पूर्ण असली तरी अंतर्गत रस्त्यांवरील खोदाई सुरू आहे. शहरातील मध्य पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर अद्यापही कामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणी नागरिकांना रस्ते खोदाईसंदर्भात माहितीफलके लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रस्ते खोदाई कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेने परस्पर त्यांना मुदतवाढ दिल्याने कुणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)