मोफत वकिलांसाठी ‘विधी’ तयारी करणार
By Admin | Updated: January 21, 2015 00:37 IST2015-01-21T00:37:37+5:302015-01-21T00:37:37+5:30
अनेकदा सत्याची बाजू असतानाही केवळ पैसा-अडका नसल्याने आणि वकिलाची फी झेपत नसल्याने अनेक गरजवंत न्यायाच्या दारातून माघारी फिरतात.

मोफत वकिलांसाठी ‘विधी’ तयारी करणार
पुणे : अनेकदा सत्याची बाजू असतानाही केवळ पैसा-अडका नसल्याने आणि वकिलाची फी झेपत नसल्याने अनेक गरजवंत न्यायाच्या दारातून माघारी फिरतात. अशा गरीब आणि गरजू पक्षकारांना मोफत वकील देण्याची सुविधा विधी सेवा प्राधिकरणाकडे उपलब्ध आहे. मात्र पुण्यातील विधी सेवा प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या वकिलांची मोफत सेवा देण्याचा निरुत्साह पाहून आता नव्याने वकिलांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा असलेले आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या वकिलांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने न्यायालयात येणाऱ्या गरीब, गरजू आणि महिलांना मोफत वकील-सुविधा देण्यात येते. त्यामुळे विधी सेवा प्राधिकरणासाठी वकील म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या वकिलांनी २९ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांनी केले आहे.
न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांमध्ये वकील देण्याचीही अनेकांची ऐपत नसते. अशा गरीब, गरजू लोकांना तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मोफत वकील पुरविण्याची सुविधा आहे. त्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून न्यायालयात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांची नियुक्ती करण्यात आलेली असते. नियुक्ती करण्यात आलेल्या वकिलांना खटल्यानुसार मानधन देण्यात येत असते. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे असलेल्या वकिलांची यादी आता नव्याने तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी नेमण्यात आलेल्या वकिलांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. तसेच पक्षकारांना त्यांच्या केसेस लढताना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन नवीन यादी तयार करण्यात येणार आहे. ३१ जानेवारी रोजी वकिलांची नवीन यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)