तिसऱ्या लाटेचा धोका तरीही लसीकरण संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST2021-07-19T04:08:48+5:302021-07-19T04:08:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरासाठी सीरम इन्स्टिट्यूटने कोविड प्रतिबंधक लसीचे २५ लाख डोस देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु ...

तिसऱ्या लाटेचा धोका तरीही लसीकरण संथगतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरासाठी सीरम इन्स्टिट्यूटने कोविड प्रतिबंधक लसीचे २५ लाख डोस देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आणणे दोन महिने उलटून गेले तरी भाजप नेत्यांना जमेना. तिसऱ्या लाटेचा धोका दिसत असतानाही लसीकरण संथ गतीने चालू आहे, अशी टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
फुकट लसीची फुकटची जाहिरातबाजी, प्रत्यक्षात बोलबाला आहे विकतचाच असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. याबाबत मोहन जाेशी यांनी सांगितले की, सामाजिक बांधिलकी म्हणून पुण्यासाठी कोविशिल्ड लसीचे २५ लाख डोस देण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दाखविली. मात्र, त्याकरिता केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असल्याचे सीरमने म्हटले होते. खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारची परवानगी मिळविणे आवश्यक होते. पत्रकबाजी आणि आश्वासने याखेरीज भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काहीच केले नाही.
महाराष्ट्रात कोविडची साथ चिंताजनक आहे. त्यातही पुण्यात जास्त काळजीची स्थिती आहे. लसीकरण मात्र संथगतीने चालू आहे. सरकारी अहवालानुसार पुण्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ १३ टक्के आहे आणि फक्त पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण ५५ टक्केच आहे. ही आकडेवारी पाहता पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही समोर दिसतो आहे. तत्पूर्वी लसीकरणाचे प्रमाण पूर्णपणे वाढवायला हवे आहे, याकडे मोहन जोशी यांनी लक्ष वेधले.