रिंगरोडमुळे हवा, ध्वनिप्रदूषण २५ टक्के कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST2021-07-28T04:10:47+5:302021-07-28T04:10:47+5:30
पुणे : जिल्ह्यातील १७३.७ किलोमीटरच्या रिंगरोडमुळे पुणे शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल. अंतर कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल, ...

रिंगरोडमुळे हवा, ध्वनिप्रदूषण २५ टक्के कमी होणार
पुणे : जिल्ह्यातील १७३.७ किलोमीटरच्या रिंगरोडमुळे पुणे शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होईल. अंतर कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचेल, तसेच इंधनाची बचत होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील २० ते २५ टक्के वायू प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात दाखल होणारी व सुटणारी ६० ते ७० हजार वाहने रिंगरोडचा वापर करू शकतात. त्याचरोबर रिंगरोडमुळे पर्यटन व तीर्थक्षेत्राचा देखील विकास होईल, अशी आपेक्षा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर, सासवड, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, माणगाव, कोकण व मुंबई या ठिकाणाहून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना पुणे शहरातून जावे लागते. त्यामुळे शहराअंतर्गत रस्त्यांवर त्याचा ताण येतो. परिणामी, शहरात हवेचे व ध्वनीचे प्रदूषण वाढले आहे. याशिवाय वाहतूक कोंडी होत आहे. रिंगरोडमुळे पुणे शहरातील वाढत्या हवा व ध्वनिप्रदूषणाला आळा बसेल, असा आशावाद मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
------------------------------------
* रिंगरोडमुळे हे होणार फायदे
१. कोल्हापूर, सासवड, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, माणगाव, कोकण व मुंबई या ठिकाणांहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना शहरातून जावे लागते. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर त्याचा ताण पडत असून शहरामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. रिंगरोड पूर्ण झाल्यावर वाहने शहराबाहेरून निघून जातील व त्यामुळे शहरातील वाहतूक वर्दळ कमी होईल.
२. वाहने शहरा बाहेरून गेल्यामुळे शहरातील हवेचे, ध्वनीचे प्रदूषण व अपघात कमी होण्यास मदत होईल.
३. बाहेरून येणारी वाहने उभी करणे, नादुरुस्त वाहने यांचा अतिरिक्त येणाऱ्या भारामुळे उपलब्ध असणारी जागा अपुरी पडत आहे. मात्र, रिंगरोड तयार झाल्यावर हा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
४. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रिंगरोड हा महत्त्वपूर्ण होणार आहे.
---------------------
-पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी अंदाजे खर्च - २६ हजार ८३१ कोटी रुपये
- रोडसाठी एकूण ६८ गावांपैकी आतापर्यंत १५ गावांचे सर्वेक्षण पूर्ण
- आठ पदरी रोड हा ३८ किलोमीटरचा असून त्यात दोन पदरी सर्व्हिस रोड
- सहा पदरी रोड हा विनासर्व्हिस रोडचा असून तो ९९ किलोमीटरपर्यंत असणार
- चार पदरी रोड विनासर्व्हिस रोडचा असून तो ३७ किलोमीटर लांबीचा
--------------
टोल स्वीकारला जाणार नाही
पुणे रिंगरोड या महामार्गावर १४ मल्टिलेव्हल इंटरचेंज, आठ मोठे ब्रिज, ४७ लहान ब्रिज, १८ व्हायडक्ट (रेल्वे किंवा रस्त्यांसाठी दरीवर बांधलेला लांबलचक पूल), १७ टनेल आणि ४ रोड ओव्हर ब्रिज बांधले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाहन चालकांकडून कोणत्याही प्रकारचा टोल स्वीकारला जाणार नाही.