पावसाळा लांबल्याने तांदूळ आणखी महागणार
By Admin | Updated: July 6, 2015 04:35 IST2015-07-06T04:35:42+5:302015-07-06T04:35:42+5:30
पावसाने दडी मारल्याने मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या भागातून होणारी तांदळाची आवक कमी झाली आहे.

पावसाळा लांबल्याने तांदूळ आणखी महागणार
पुणे : पावसाने दडी मारल्याने मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या भागातून होणारी तांदळाची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात या भागातून येणाऱ्या सोनामसुरी, कोलम, चिन्नोर व आंबेमोहोर या तांदळाचे भाव वाढले आहेत; तर मागणीअभावी खोबरेल तेल व गुळाच्या भावात घट झाली.
मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून बासमती वगळता इतर तांदळाची आवक मोठ्या प्रमाणावर होते. मात्र या भागात पावसाने दडी मारल्याने सध्या चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्याने तेथील उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तेथील व्यापाऱ्यांनी तांदळाचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच तेथील बाजारभावही वाढला आहे. परिणामी पुण्यातील बाजारपेठेत तांदळाचे भाव क्लिंटलमागे २०० रुपयांनी वाढले आहेत. पाऊस आणखी लांबल्याने तांदूळ आणखी महागेल, अशी माहिती व्यापारी राजेश शहा यांनी दिली.
मागणीअभावी खोबरेल तेलाच्या भावात १०० रुपयांनी तर गुळाच्या भावात ५० ते १०० रुपयांची घट झाली. साबुदाण्याच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली. इतर खाद्यतेल, साखर, गहू, ज्वारी, बाजरी, डाळी, मिरची, रवा, मैदा, पोह्याचे भाव स्थिर राहिले.