प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST2021-05-14T04:11:02+5:302021-05-14T04:11:02+5:30
- -- -- - - - - - - - - - - - - क्रांतिकारकांचा मार्ग अत्यंत खडतर ...

प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक
- -- -- - - - - - - - - - - - -
क्रांतिकारकांचा मार्ग अत्यंत खडतर आणि गुप्ततेचा. अनेकवेळा एकमेकांमध्येही ते क्रांतिकारक वेगळ्या टोपणनावाने ओळखले जात. फितुरीची भीती असल्यामुळे सर्वच पातळीवर गुप्तता पाळावी लागे. पण त्यामुळे क्रांतिकार्यातील सहभागी काही क्रांतिकारकांचे चरित्र मात्र इतिहासाला पूर्णपणे उलगडता आलेले नाहीत. त्यातीलच एक महेंद्रनाथ डे. ते मूळचे कोलकाता येथे राहणारे. तिथेच त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. पुढे संन्यासाश्रमी होऊन स्वामी योगेंद्र महाराज या नावाने त्यांनी सिलचर (आसाम) येथे 'जगतसी आश्रम' या नावाने आश्रम सुरू केला. या आश्रमात अनेक तरुणांना शस्त्रविद्या शिकवली जाई. गुप्तपणे क्रांतिकारी चळवळी होत असत. परंतु केवळ संशयावरून पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करता येत नव्हती. २७ मार्च १९१२ या दिवशी सिल्हेटच्या मौलवी बाजारमध्ये जॉर्डन या इंग्रजी अधिकाऱ्याच्या बंगल्याजवळ एक बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोट करणारी व्यक्तीही त्यात मरण पावली होती. येथे सापडलेले बॉम्बचे अवशेष आणि दिल्लीचा बॉम्बस्फोट यातील बॉम्ब एकाच प्रकारचा आहे, असे पोलिसांच्या लक्षात आल्यावर ६ जुलै १९१२ रोजी सशस्त्र पोलिसांनी आश्रमाची झडती घेतली. पण तिथे कुठलेच पुरावे सापडले नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी इंग्रजांनी आश्रमावर गोळीबार केला. त्याला आश्रमातील क्रांतिकारकांनी गोळीनेच उत्तर दिले. या चकमकीमध्ये स्वामी योगेंद्र गंभीर जखमी झाले. सध्याच्या बांगलादेशमध्ये असलेल्या सिल्हेटमधील तुरुंगात त्यानंतर केवळ आठ दिवसांनी म्हणजेच १६ जुलै १९१२ रोजी त्यांचे निधन झाले. बंकिमचंद्र यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीतील वीर सन्याशांच्या कथेतून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारक संन्यासी मार्ग स्वीकारून क्रांतिकार्य करत होते. त्यातलेच एक हे महत्त्वाचे नाव, स्वामी योगेंद्र. दुर्दैवाने आश्रमाच्या क्रांतिकार्यातील गुप्ततेमुळे योगेंद्रांच्या सहकाऱ्यांबद्दल किंवा त्यांच्या स्वतःच्या क्रांतिकार्याबद्दल अधिक माहिती मिळू शकत नाही.