स्थलांतरित पक्ष्यांच्या परतण्याने बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:20+5:302021-02-05T05:01:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्थलांतरित पक्षी परतू लागल्याने राज्यातील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसते आहे. कोंबड्या व ...

स्थलांतरित पक्ष्यांच्या परतण्याने बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्थलांतरित पक्षी परतू लागल्याने राज्यातील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसते आहे. कोंबड्या व अन्य पक्ष्यांमध्येही अचानक मृत होण्याची संख्या कमी झाली आहे. भोपाळ व पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या पक्ष्यांचे नमुनेही निगेटिव्ह येत आहेत. तरीही पोल्ट्री फार्म चालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
फेब्रवारीच्या पहिल्याच दिवशी राज्यात पाळीव कोंबड्यांमघ्ये अहमदनगर-४२, उस्मानाबाद-११ आणि बुलडाणा-१० अशा फक्त ६३ कोंबड्या अचानक मृत झाल्या. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या दररोज २०० असायची. याशिवाय बगळे, चिमण्या, पोपट अशा पक्ष्यांमधील अचानक मरतुकीचे प्रमाणही घटले आहे. पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये पुणे-१, आणि नांदेड येथे-५, अशी एकूण ६ पक्ष्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये मुंबई-२, रत्नागिरी-१, अकोला-४, अमरावती-१ व बुलढाणा येथे-१७ कावळे मृत झाल्याची नोंद आहे.
अशा मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी म्हणून भोपाळ व पुण्यातील प्रयोगशाळांमध्ये पाठवतात. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालातही १ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्यात कुक्कुट पक्ष्यात ठाणे जिल्ह्यातील महापे व घनसोली अशा दोनच ठिकाणचे नमुने ‘बर्ड फ्लू’साठी होकारार्थी मिळाले आहेत. अन्य नमुने नकारार्थी आहेत. जानेवारीच्या मध्यात होकारार्थी नमुन्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असायची.
स्थलांतरित पक्ष्यांच्या माध्यमातून ‘बर्ड फ्लू’ आला असल्याचा निष्कर्ष पशुसंवर्धन विभागाने तपासणीनंतर काढला होता. त्यामुळेच प्रमाण वाढत असल्याचा दावा करण्यात येत होता. आता कमी झाल्याचे कारण विचारले असता स्थलांतरित पक्षी परत आपापल्या ठिकाणी जाण्याचा काळ सुरू झाला असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर ‘बर्ड फ्लू’ आढळला त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली. १ किलोमीटरच्या परिघातील सर्व पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या नष्ट केल्या. तिथे निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवली. पाळीव पक्ष्यांचा संपर्क तोडला. त्यामुळेही या आजाराची वाढत जाणारी साखळी तुटली असल्याचे या विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आता मृत पक्ष्यांच्या तपासणीत ‘बर्ड फ्लू’ आढळत नसला तरीही काळजी घेण्याची गरज आहे. प्रामुख्याने पोल्ट्री फार्म चालकांनी कोंबड्यांचा बाहेरील कोणत्याही पक्ष्यांबरोबर संपर्क येऊ देऊ नये. कावळे, बगळे, चिमण्या यांचा पोल्ट्रीमध्ये प्रवेश होऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे.