एफआरपीची बाकी व्याजासह द्या
By Admin | Updated: January 28, 2015 02:23 IST2015-01-28T02:23:17+5:302015-01-28T02:23:17+5:30
सोमेश्वर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामातील न दिलेल्या एफआरपीबाबतच्या लढ्याला शेतकरी कृती समितीला यश आले आहे

एफआरपीची बाकी व्याजासह द्या
सोमेश्वनगर : सोमेश्वर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामातील न दिलेल्या एफआरपीबाबतच्या लढ्याला शेतकरी कृती समितीला यश आले आहे. गतवर्षी न दिलेली एफआरपी १२१ रुपये व्याजासह देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
सोमेश्वर कारखान्याच्या २०१३-१४ च्या एफआरपीबाबत शेतकरी कृती समितीने आक्षेप घेतला होता. याबाबत शेतकरी कृती समितीचे प्रमुख सतीश काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. त्यानुसार गेल्या सव्वा वर्षापासून २०१३-१४च्या एफआरपीबाबत सुनावण्या सुरू होत्या. तत्कालीन आयुक्तांनी १७ जुलै २०१४ रोजी ही एफआरपी २२५७ प्रतिटन बरोबर असल्याचा आदेश दिला. त्यावर व्याजाची आकारणी करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांना दिले होते. त्यावर तत्कालीन साखर आयुक्तांची बदली झाली. त्यानंतर एफआरपीच्या निर्णयासाठी २ सुनावण्यांमध्ये निकाल होणे अपेक्षित होते. मात्र, साखर आयुक्तांनी ५ ते ६ सुनावण्या घेतल्या. त्यामुळे निर्णय २ ते ३ महिने लांबला. २ डिसेंबर २०१४ रोजी साखर आयुक्तांनी प्रादेशिक सहसंचालकांना २२५७ एफआरपी ग्राह्य धरून आरआरसी प्रस्ताव करण्यासाठी सुधारित व्याज आकारणी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी लेखा परीक्षक देशमुख यांचा व्याज आकारणीच्या अभिप्रायासह
साखर आयुक्तांना खुलासा सादर केला. त्यावर साखर आयुक्त कार्यालयाने श्री सोमेश्वर कारखान्याचा खुलासा मागविला. परंतु, कारखान्याने याबाबत कोणतीही पूर्तता केली नाही. त्यामुळे २३ जानेवारी २०१४ रोजी थकीत एफआरपीबाबत आदेश दिला.
या निर्णयाचे शेतकरी कृती समितीने स्वागत केले आहे. दरम्यान, साखर आयुक्तांनी शेतकरी कृती समितीने दिलेल्या सोमेश्वर कारखान्याबाबत असलेल्या तक्रारीवर निकाल होण्यासाठी सहसंचालकांना आदेश द्यावेत, अशी मागणी कृती समितीने करण्यात आली आहे.
(वार्ताहर)