जिल्ह्यात पुन्हा लग्न समारंभ, कार्यक्रमांवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:15 IST2021-02-17T04:15:52+5:302021-02-17T04:15:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात नागपूर, आमरावतीसह अन्य काही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्या प्रशासनाला ...

जिल्ह्यात पुन्हा लग्न समारंभ, कार्यक्रमांवर निर्बंध
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात नागपूर, आमरावतीसह अन्य काही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांवर पुन्हा एकदा कडक कारवाई करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. तसेच सध्या सर्व गोष्टी खुल्या झाल्याने लग्न समारंभ व अन्य सर्व कार्यक्रमात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. यामुळेच जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा लग्न समारंभ, कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याचा विचार करत असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
राज्यात पुण्यासह अन्य काही जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्हीसी द्वारे राज्याचा कोरोना आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा प्रशासनाना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत देशमुख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात उद्या पासून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यात देखील लग्नांचा हंगाम सुरू असून लवकरच जत्रा-यात्रा सुरू होणार आहेत. लग्न समारंभात सध्या सर्व नियमांचे उल्लंघन केले जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन व प्रत्येक तालुक्याचा आढावा घेऊन लग्न समारंभ व कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याचा विचार करत असल्याचे डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.