सफाई कामगाराची जिद्द मुख्याधिकारी होण्याची
By Admin | Updated: January 26, 2015 01:15 IST2015-01-26T01:15:38+5:302015-01-26T01:15:38+5:30
जुन्नर नगरपालिकेत गटार सफाईकाम करणारा तरुण... परिस्थितीवर मात करून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतो. पूर्व व मुख्य परीक्षेत यश संपादन करतो;

सफाई कामगाराची जिद्द मुख्याधिकारी होण्याची
आनंद कांबळे, आपटाळे
जुन्नर नगरपालिकेत गटार सफाईकाम करणारा तरुण... परिस्थितीवर मात करून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतो. पूर्व व मुख्य परीक्षेत यश संपादन करतो; मात्र तोंडी मुलाखतीत अपयश येते. अपयशाला न घाबरता... पालिकेचा मुख्याधिकारी व्हायचेच, या ध्येयाने पुन्हा भरारी घेत आहे.
जुन्नर शहरातील पाडळी येथे राहणारा तरुण अमित गणपत रोकडे हा बारावी पास झाल्यानंतर घरातील आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिकेत २००४मध्ये गटार साफ करणारा कामगार म्हणून दाखल झाला. अमितच्या वर्गातील मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. महाविद्यालयाच्या रस्त्याकडील गटारे साफ करताना आपल्या मित्र-मैत्रिणी आपल्याकडे पाहतात, या जाणिवेने त्याला लाज वाटत असे. मात्र, मनात ध्येय घेऊन आपण काम करीत आहोत, याची जाणीव ठेवून तो सफाईचे काम प्रामाणिक करीत आहे.
गटारे साफ करणे हे कमी दर्जाचे काम आहे; मात्र मला अधिकारी व्हायचेच, या उद्देशाने आपण हे काम करीत आहोत. त्याकरिता त्याने बहि:स्थ शिक्षण घेऊन एम.ए. (राज्यशास्त्र) पदवी घेतली. एका कार्यक्रमात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितले, की कोणतेही काम कर; पण जिद्द सोडू नकोस. अमितने या सल्ल्यानुसार राज्य सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात पीएसआय (फौजदार) परीक्षेत त्याने पूर्व व मुख्य परीक्षेत यश संपादन केले. मात्र, तोंडी परीक्षेत अपयश आले; पण ‘जिद्द सोडू नकोस,’ हा सल्ला लक्षात घेऊन तो सेल टॅक्स व राज्य आयोगाची पुन्हा जोरदार तयारी करीत आहे.
सकाळी गटारे साफ करायची, सकाळ सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळात श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, हे त्याचे नित्याचे सुरू आहे.