तक्रारमुक्त पालिकेसाठी संकल्प
By Admin | Updated: December 31, 2015 04:07 IST2015-12-31T04:07:58+5:302015-12-31T04:07:58+5:30
आगामी २०१६ या नववर्षामध्ये महापालिकेबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होऊन तक्रारमुक्त पालिका व्हावी तसेच शहराला २४ तास पाणीपुरवठा व्हावा, या दिशेने

तक्रारमुक्त पालिकेसाठी संकल्प
पुणे : आगामी २०१६ या नववर्षामध्ये महापालिकेबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी होऊन तक्रारमुक्त पालिका व्हावी तसेच शहराला २४ तास पाणीपुरवठा व्हावा, या दिशेने पावले उचलून हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचा संकल्प आयुक्त कुणाल कुमार यांनी सोडला आहे. तक्रार निवारणाकरिता स्वतंत्र कक्ष, २४ पाणीपुरवठयासाठी निधी उभारणी याचा आराखडा तयार केला असल्याची कुमार यांनी बुधवारी दिली.
मेट्रोच्या कामाला सुरुवात करणे, स्मार्ट सिटीच्या दिशेने पावले टाकणे, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम करणे, एसएमटीआर प्रकल्प ३ वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करणे, उड्डाणपूल व रस्त्यांची कामे मार्गी लावणे आदी कामे २०१६ मध्ये अग्रक्रमाने केली जाणार असल्याची माहिती कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कुमार यांनी सांगितले, ‘नागरिकांच्या तक्रारी मांडणे सोपे जावे, याकरिता महापालिकेकडून यापूर्वीच संकेतस्थळावरून आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच फेसबुक पेज, टिष्ट्वटर यावरदेखील तक्रार नोंदविता येते. त्याचबरोबर आता स्वतंत्र मोबाइल अॅप महापालिकेकडून विकसित केले जात आहे. तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स अॅपचा एक क्रमांकदेखील लवकरच जाहीर केला जाणार आहे. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेमध्ये एका स्वतंत्र कक्षाची स्थापना केली जाणार आहे. या कक्षासाठी दहा जणांची टीम तयार केली जाईल. नागरिकांच्या तक्रारी तातडीने मार्गी लागण्यास यामुळे मदत होऊ शकेल.’
येत्या वर्षभरात २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रकल्प कार्यान्वित होऊन शहराला पूर्णवेळ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी साधारणत: २७०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, तो खर्च १७०० ते १८०० कोटी रुपयांपर्यंत कमी करता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १० वर्षे वाट पाहायला न लागता तो एका वर्षात मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.
सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेकडे लोकांना वळविण्याचे मोठे आव्हान आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर चांगल्या दर्जाची बीआरटी सेवा पुरविली जाणार आहे. संपूर्ण शहरासाठी पार्किंग पॉलिसी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे, यामुळेही वाहतुकीला शिस्त लावण्यास मोठी मदत होऊ शकेल.
संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया व हगणदारीमुक्त शहर
शहरातील सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे लक्ष्य डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत गाठले जाणार आहे. तसेच २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत शहरातील एकही मनुष्य उघड्यावर शौचास जाणार नाही, याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार शहरामध्ये सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची उभारणी केली जात असल्याची माहिती कुमार यांनी दिली.
जायका प्रकल्पाला वित्त मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर आता एका कराराची औपचारिकता बाकी आहे. त्यानंतर नदी सुधारणेच्या कामास लगेच सुरुवात होणार आहे, असे कुणाल कुमार यांनी सांगितले. शहरामध्ये तयार होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी नदीमध्ये सोडण्यासाठी केंद्र शासनाने ९०० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामुळे नदीला आलेले नाल्याचे स्वरूप बदलण्यास मदत होणार आहे.