स्मार्ट सिटी सहभागाचा संकल्प

By Admin | Updated: May 4, 2016 04:26 IST2016-05-04T04:26:15+5:302016-05-04T04:26:15+5:30

महापालिकेचे कामकाज आॅनलाइन, स्वच्छ, लोकाभिमुख आणि गतिमान करण्याबरोबरच पर्यावरण समतोल राखणे, शहर वायफाय करणे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर स्मार्ट

Resolution of smart city participation | स्मार्ट सिटी सहभागाचा संकल्प

स्मार्ट सिटी सहभागाचा संकल्प

पिंपरी : महापालिकेचे कामकाज आॅनलाइन, स्वच्छ, लोकाभिमुख आणि गतिमान करण्याबरोबरच पर्यावरण समतोल राखणे, शहर वायफाय करणे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटीत शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे, निष्पक्षपणे कामकाज करण्यावर भर देणार आहे, असे मत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे वाघमारे यांनी आज दुपारी स्वीकारली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ग्रीन, क्लीन, वायफाय, स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आयुक्त म्हणाले, ‘‘नवी मुंबईशी मिळते-जुळते असे पिंपरी-चिंचवड शहर आहे. या शहरात औद्योगिकीकरण आहे, त्याचबरोबर मुंबईतील सिडकोसारखे प्राधिकरणही आहे. सुनियोजित विकास झाला आहे. सर्वश्रेष्ठ सुविधा येथे आहेत. स्वच्छतेचा देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे कारभार गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.’’ (प्रतिनिधी)

पहिल्याच दिवशी आयुक्त कार्यरत
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारताच त्यांनी महापालिका भवनातील कार्यालयांची पाहणी केली. तसेच विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाची माहिती घेतली. मंगळवारी नवीन आयुक्त पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच अधिकारी व कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. सर्वांचीच धावपळ सुरू होती. दरम्यान, दुपारच्या वेळी दिनेश वाघमारे महापालिका भवनात आल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. पदाधिकारी, अधिकाऱ्यांंनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आयुक्तांनी चौथ्या मजल्यावर असलेल्या प्रशासन विभाग, दक्षता व नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. ओळख करून घेण्यासह कामाचे स्वरूप जाणून घेतले. सुमारे दीड तास ही बैठक सुरू होती.

अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई
महापालिकेत अनधिकृत बांधकामांसाठी स्वतंत्र कक्ष आहे, त्याच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत राज्य शासनाचे जे नियोजन असेल किंवा न्यायालयाचे जे निर्देश असतील, त्यानुसार कारवाई केली जाईल. यापुढे होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई होईल. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र होईल.

स्वच्छ, अमृत योजना राबविणार
केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ आणि अमृत अशा विविध योजना सुरू आहेत. त्या शहरात राबविण्याचा प्रयत्न करीन. घनकचरा व्यवस्थापन सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना करू, नवी मुंबईत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवले, तसे प्रकल्प येथेही राबवले जातील. त्यातून उत्पन्न मिळाले नाही तरी चालेल. कचरा व्यवस्थापन केले जाईल.

झोपडपट्टी भागात स्वच्छतागृहे
स्वच्छता लक्षात घेता झोपडपट्टीच्या भागात ड्रेनेज लाइन व वैयक्तिक स्वच्छतागृह तयार करण्यावर भर राहील. त्यामुळे शहर अधिक स्वच्छ राहील. सर्व प्रभागांच्या कामांची वर्गवारी करून ती कामे त्या त्या प्रभागातच केली जावीत, याचे नियोजन केले जाणार आहे. त्यादृष्टिने योग्य ते प्रयत्न केले जातील.

पक्षविरहित काम करणार
कोणत्याही राजकीय पक्षाच्या आहारी जाऊन किंवा कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध असे पक्षपातीपणे काम न करता नि:पक्षपातीपणे काम करण्यावर माझा भर राहील. माझ्यावर कोणत्याही पक्षाचा शिक्का नाही आणि नसेलही. तसेच माझे प्रशासन हे स्वच्छ व लोकाभिमुख असेल. नागरिक-लोकप्रतिनिधी-प्रशासन असा सुसंवाद असेल. त्यातून शहराचा विकास साधला जाईल.

पाण्याचे नियोजन करणार
‘यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे पाणीकपात केली आहे. पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी नियोजन करणार आहे. नियोजन केल्यास सध्या उपलब्ध साठ्यावर ३१ जुलैपर्यंत पाणी उपलब्ध होऊ शकते.
रखडलेले बीआरटी मार्ग लवकर सुरू करू. त्यांचे विस्तारीकरण करणे, इतर वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर राहील. सीसीटीव्ही बसविणार आहे.

Web Title: Resolution of smart city participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.