अनधिकृत इमल्यामुळे रहिवासी चिंतेत

By Admin | Updated: November 10, 2014 05:04 IST2014-11-10T05:04:00+5:302014-11-10T05:04:00+5:30

नऱ्हे येथील अनधिकृत इमारत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे

Residents worry because of unauthorized immunity | अनधिकृत इमल्यामुळे रहिवासी चिंतेत

अनधिकृत इमल्यामुळे रहिवासी चिंतेत

जयवंत गंधाले, हडपसर
नऱ्हे येथील अनधिकृत इमारत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्व भागातील कदम-वाकवस्ती, हांडेवाडी, मांजरी, शेवाळेवाडी, केशवनगर आदी उपनगरांलगतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याच्या चर्चेने सदनिकाधारक घाबरले आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् पोटात भीती असल्याने रहिवासी चिंतेत आहेत. मात्र, ग्रामपंचायती व जिल्हा प्रशासनाने हात वर केले आहेत.
महापालिका हद्दीलगतच्या गावांतील अनधिकृत बांधकामांचे इमले काही एका दिवसात तयार झालेले नाहीत. ग्रामपंचायतीचा आशीर्वाद अन् जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळेच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. नवीन बांधकामाच्या जुन्या नोंदी करण्यात ग्रामपंचायतीने हात धुऊन घेतले आहे. मात्र, सर्वसामान्य नोकरदार व मध्यमवर्गीय परवडणाऱ्या घराच्या आशेने अनधिकृत बांधकामाला बळी पडले आहेत. त्यासाठी बिल्डर जितक्या प्रमाणात जबाबदार आहेत, तितकेच प्रशासनही आहे. मात्र, एखादी इमारत कोसळल्यानंतर पुन्हा सामान्य नागरिकांच्या घरावरच प्रशासनाचा हातोडा पडतो, अशी व्यथा नागरिकांना लोकमतशी बोलताना मांडली.
महापालिका हद्दीत नव्याने ४३ गावांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये पूर्व भागातील कदम-वाकवस्ती, हांडेवाडी, मांजरी, शेवाळेवाडी, केशवनगरचा समावेश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी नव्याने गावांचा समावेश करण्याची अधिसूचना काढली. त्यानंतर हद्दीलगतच्या गावांतील अनधिकृत बांधकामाला वेग आला आहे.
उपनगरालगतच्या प्रत्येक गावात बेकायदा बांधकामे बिनदिक्कत सुरू आहेत. दोन-तीन मजल्यांची परवानगी घ्यायची आणि पाच-सात मजल्यांपर्यंत बांधकामे केली आहेत. ग्राहकांना सदनिकेची विक्री करताना नियोजन विभागाने बांधकाम सुरू करताना दिलेला परवाना दाखविला जातो. ग्राहकांची दिशाभूल करण्यात व्यावसायिक तरबेज आहेत. इमारती बांधताना कोणतेही नियम पाळलेले नसतात, त्यामुळे एखादी दुर्घटना घडली, तर तातडीची सेवा देता येणेही अवघड होऊन बसत आहे.

Web Title: Residents worry because of unauthorized immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.