आपत्कालीन मदतीसाठी ‘रेसरेक्ट’ अ‍ॅप

By Admin | Updated: January 25, 2017 02:05 IST2017-01-25T02:05:42+5:302017-01-25T02:05:42+5:30

संगणक शास्त्राचे शिक्षण घेतलेले नसताना, इंटरनेटवर उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या पिंपळे

'Reset' app for emergency help | आपत्कालीन मदतीसाठी ‘रेसरेक्ट’ अ‍ॅप

आपत्कालीन मदतीसाठी ‘रेसरेक्ट’ अ‍ॅप

पिंपरी : संगणक शास्त्राचे शिक्षण घेतलेले नसताना, इंटरनेटवर उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे नववीच्या वर्गात शिकणाऱ्या पिंपळे गुरव येथील आशिष कामाठी या विद्यार्थ्याने ‘रेसरेक्ट अ‍ॅप’ तयार केले आहे. कधी वैद्यकीय मदतीची, तर कधी पोलिसांची आणि अग्निशामक दलाची गरज भासेल, कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थतीशी सामना करण्याची वेळ येईल, तेव्हा या अ‍ॅपच्या मदतीने संबंधित विभागाकडून तातडीची मदत मिळविणे शक्य होईल. असे हे अ‍ॅप पदोपदी कामी येणार आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश अ‍ॅप हे व्यावसायिकांनी किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केल्याचे दिसून येते. बालपणापासूनच इंटरनेटची आवड असणाऱ्या आशिषने इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. दोन महिने विविध प्रकारच्या ‘अ‍ॅप’चा अभ्यास करून त्याने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला तातडीने मदत पुरविण्याच्या दृष्टीने अ‍ॅप उपयुक्त ठरणारे आहे, असे त्याचे मत आहे. ३० एमबी क्षमता असलेल्या या अ‍ॅपमध्ये तातडीक वैद्यकीय सेवा, पोलीस यंत्रणेची मदत, अग्निशामक दलाचे तत्काळ साहाय्य, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागांना तव्रित संदेश पोहोचेल, अशी सुविधा आहे.
छातीत कळ आली, अपघात झाला अशा वेळी वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास या अ‍ॅपव्दारे तत्काळ मदत प्राप्त होऊ शकते. एखादा गुन्हा समोर घडत असेल, तर त्याचीही थेट माहिती अ‍ॅपद्वारे पोलिसांना कळविणे शक्य होते. तत्काळ पोलीस यंत्रणेचे साहाय्य मिळू शकेल. आपत्कालीन परिस्थितीची माहिती, तसेच मदत मिळण्यासही अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Reset' app for emergency help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.