काँग्रेसच्या ऐनवेळच्या बदलाने राष्ट्रवादीत संताप
By Admin | Updated: January 31, 2017 04:53 IST2017-01-31T04:53:43+5:302017-01-31T04:53:43+5:30
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीवरचे मळभ कमी होण्याऐवजी दाट झाले आहे. सोमवारी रात्री काँग्रेसचे नेते मुंबईत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पुण्यात

काँग्रेसच्या ऐनवेळच्या बदलाने राष्ट्रवादीत संताप
पुणे: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीवरचे मळभ कमी होण्याऐवजी दाट झाले आहे. सोमवारी रात्री काँग्रेसचे नेते मुंबईत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पुण्यात अशी स्थिती होती. त्यामुळे संयुक्त चर्चा झालीच नाही. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण व महापौर प्रशांत जगताप यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना कार्यकर्ते, पदाधिकारी त्रस्त झाले असल्याचे सांगितले.
रविवारी रात्रीही दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झालीच नाही. स्वतंत्र बैठका मात्र झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या बैठकीत काँग्रेसला ६० जागा देण्याचा निर्णय घेतला. कोंढवा येथील काँग्रेसचे रईस सुंडके यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिला आहे. तेथील सर्व जागा हव्यात असा काँग्रेसचा आग्रह आहे, तर राष्ट्रवादीलाही त्या सर्व जागा लढवायच्या आहेत. तरीही त्यांनी दोन जागा देण्याची तयारी दाखविली, मात्र काँग्रेसने त्याला नकार दिला. अखेर राष्ट्रवादीने बाकी जागा आघाडी करून लढवू व त्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत करू असा प्रस्ताव दिला. मात्र त्यावर काँग्रेसने काहीच विचार केला नाही. तसेच ऐन वेळी काही जागांमध्ये बदल करून हवा, असे पत्र दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही ताठर भूमिका घेतली आहे. सोमवारी दुपारी मुंबईत संयुक्त बैठक होणार आहे असे सांगण्यात आले, मात्र आज दिवसभरात अशी बैठक झालीच नाही. पवार रात्री पुण्यातच होते, तर काँग्रेसच्या पार्लमेंटरी कमिटीची बैठक मुंबईत सुरू होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच कमिटीचे अन्य ज्येष्ठ सदस्य या वेळी उपस्थित होते. त्यात छाननी समितीने दिलेल्या उमेदवार यादीवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)