रिपब्लिकन पक्ष करणार भाजपाविरोधात तक्रार

By Admin | Updated: February 13, 2017 02:26 IST2017-02-13T02:26:34+5:302017-02-13T02:26:34+5:30

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.

The Republican party will complain against the BJP | रिपब्लिकन पक्ष करणार भाजपाविरोधात तक्रार

रिपब्लिकन पक्ष करणार भाजपाविरोधात तक्रार

पुणे : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे. युती नसतानाही भाजपाच्या उमेदवारांकडून रिपाइंबरोबर युती असल्याचे प्रचारामध्ये दाखविले जात असल्याबद्धल रिपाइं पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. त्यासाठी प्रचारसभांमध्ये गळ्यात रिपाइंचे नाव असलेले झेंडे घातलेल्या उमेदवारांची छायाचित्रेही पक्षाने जमा केली आहेत.
भाजपाची लोकसभा स्तरावर रिपाइंबरोबर युती आहे. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात समाजकल्याण राज्यमंत्री आहेत. महापालिका निवडणुकीतही ही युती असावी, असा भाजपाचा आग्रह होता. तशी चर्चाही झाली होती. मात्र जागावाटप तसेच चिन्हाच्या मुद्द्यांवरून रिपाइंचे नेते नाराज झाले. रिपाइंचे पारंपरिक चिन्ह गोठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांना युती केली असती तरी स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवावी लागली असती. भाजपाने पुण्यात रिपाइंला १० जागा देऊ केल्या, मात्र स्वतंत्र चिन्ह न घेता भाजपाच्याच कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी राजी केले.
त्यामुळे रिपाइं कार्यकर्त्यांत संताप निर्माण झाला. अशाने पक्षाचे अस्तित्त्वच संपून जाईल, अशी तक्रार या संतप्त कार्यकर्त्यांनी आठवले यांच्याकडे केली. त्याची दखल घेत आठवले यांनी मुंबई वगळता राज्यात अन्य ठिकाणी भाजपाबरोबरची युती तुटली आहे, असे जाहीर केले. तसेच कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढविणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांना निलंबीत करण्याची कारवाई केली. त्यात पुण्याचाही समावेश आहे, असे असताना भाजपाकडून त्यांचे उमेदवार रिपाइंबरोबर युती असल्याचे दाखवित असल्याचे रिपाइंच्या स्थानिक तसेच प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रिपाइंच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्ष संगीता आठवले यांनी सांगितले, की आम्ही त्यांना आमचा ध्वज व नाव तसेच मंत्री आठवले यांचे छायाचित्र वापरण्यास मनाई केली आहे. स्वत: आठवले यांनीही तसे जाहीर केले आहे, मात्र भाजपाकडून ते वापरले जात असल्याचे त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारातून स्पष्ट दिसते आहे. त्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. रिपाइंच्या युवा शाखेचे पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनीही याला दुजोरा दिला. नागपूर व सोलापूर येथील रिपाइंच्या शाखांनी अशी तक्रार केल्यानंतर तिथे भाजपाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
आठवले आज मुंबईत
पक्षाध्यक्ष व मंत्री आठवले सोमवारी मुंबईत येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे, असे संगीता आठवले यांनी सांगितले. पुण्यातून सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांची यासाठी भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रिपाइंचे पारंपरिक चिन्ह गोठवण्यात आले आहे़
भाजपाने पुण्यात रिपाइंला १० जागा देऊ केल्या, मात्र स्वतंत्र चिन्ह न घेता भाजपाच्याच कमळ या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी राजी केले.

Web Title: The Republican party will complain against the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.