अवैध बांधकामाबाबतचा अहवाल आठवडाभरात
By Admin | Updated: January 13, 2015 05:43 IST2015-01-13T05:43:09+5:302015-01-13T05:43:09+5:30
अनधिकृत बांधकामांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या सीताराम कुंटे समितीचा अहवाल पुढील आठ दिवसांत सादर होईल

अवैध बांधकामाबाबतचा अहवाल आठवडाभरात
पिंपरी : अनधिकृत बांधकामांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या सीताराम कुंटे समितीचा अहवाल पुढील आठ दिवसांत सादर होईल, अशी माहिती समितीचे सदस्य व आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
समितीच्या अहवालानंतर निर्णय घ्यायचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीला अहवाल सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, मुदतीनंतर १२ दिवस उलटले असून अजूनही अहवाल सादर झालेला नाही. भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांवर पुण्यात बैठक घेतली. त्या वेळी आमदार, पदाधिकाऱ्यांपासून, प्रशासकीय अधिकारी, आयुक्त यांनी अनधिकृत बांधकाम प्रश्नाबाबत तोडगा काढावा, निर्णय घ्यावा, असे आवाहन केले होते. दरम्यान, राज्यातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गंभीर बनला असताना या संदर्भात धोरण ठरविणे आणि अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी काय करता येईल, यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली १६ प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली.
पिंपरीचे आयुक्त जाधव हे सदस्य आहेत. या समितीने शहरांचा आढावा घेतला. पुण्याच्या बैठकीत कुंटे समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, असे सांगून समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदत दिली होती. दरम्यान, राज्यात अनधिकृत बांधकामांमध्ये सर्वाधिक बांधकामे पिंपरी-चिंचवड शहरात असल्याने समितीने नुकतीच शहरात भेट देऊन बांधकामांची पाहणी केली.
अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्याची मुदत संपली आहे. आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘समितीचे कामकाज सुरू आहे. त्याबाबत अहवालासाठी अंतिम प्रक्रि या सुरू असून, पुढील आठ दिवसांत अहवाल तयार होऊन तो सादर केला जाऊ शकतो.’’(प्रतिनिधी)