महापौर चषकात ‘राष्ट्रकुल’ची पुनरावृत्ती
By Admin | Updated: December 17, 2014 05:30 IST2014-12-17T05:30:21+5:302014-12-17T05:30:21+5:30
महापालिकेकडून भरविण्यात येणाऱ्या यंदाच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजनापूर्वीच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.

महापौर चषकात ‘राष्ट्रकुल’ची पुनरावृत्ती
पुणे : महापालिकेकडून भरविण्यात येणाऱ्या यंदाच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजनापूर्वीच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. या स्पर्धेसाठीच्या २ कोटी ४४ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे. मात्र, ही मान्यता देताना, स्पर्धांच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या मान्यताप्राप्त क्रीडा संस्थांनी सादर केलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांची रक्कम पाहण्याची तसदीही स्थायी समितीने न घेतल्याने पालिकेच्या लाखो रुपयांवर हात साफ केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती महापालिका नक्कीच करणार, अशी चर्चा पालिकेत रंगली आहे.
महापालिकेच्या वतीने दर वर्षी महापौर चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. २०१४-१५ या वर्षाच्या क्रीडा स्पर्धेंतर्गत तब्बल २६ स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी तब्बल २ कोटी ४४ लाख रुपयांच्या खर्चास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या मान्यतेनुसार, अवघा ६९ लाखांचा खर्च हा खेळांडूच्या बक्षिसांवर होणार असून, उर्वरित १ कोटी ७५ लाखांचा खर्च स्पर्धांच्या आयोजनांवर केला जाणार आहे. वेगवेगळ्या क्रीडा संस्थांमार्फत या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार संबंधित संस्थांनी प्रत्येक स्पर्धेसाठी लागणाऱ्याची खर्चाची आकडेवारी प्रशासनाकडे सादर केली होती. त्यास मान्यता दिली असल्याचे समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, वेगवेगळ्या कामाचा खर्च मात्र डोंगराएवढा आहे. (प्रतिनिधी)