झुडपे काढा; अन्यथा आंदोलन
By Admin | Updated: July 13, 2015 23:49 IST2015-07-13T23:49:37+5:302015-07-13T23:49:37+5:30
शिरसटवाडी (ता. इंदापूर) येथील काटेरी झुडपांच्यामुळे होणारे अपघात, पाणीटंचाई, तसेच स्वच्छतागृहाच्या अनुदानाबाबत प्रशासनाने दुर्लक्ष

झुडपे काढा; अन्यथा आंदोलन
वालचंदनगर : शिरसटवाडी (ता. इंदापूर) येथील काटेरी झुडपांच्यामुळे होणारे अपघात, पाणीटंचाई, तसेच स्वच्छतागृहाच्या अनुदानाबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
शिरसटवाडीगाव ते पागळेवस्ती ५४ फाटा व शिरसटवाडी ते रणगावमार्गे वालचंदनगरला जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर दोन्ही बाजूस काटेरी बाभळीची झाडे वाढली आहेत. या रस्त्यावरील वेडीवाकडी वळणे यामुळे अनेक धोके झाले आहेत. त्यात सतत वाढ होत आहे. या रस्त्यावरून शेळगाव, रणगाव, वालचंदनगर, निमगाव केतकी, इंदापूर येथे शिक्षणासाठी जाणारे शेकडो विद्यार्थी, शेतकरी, कंपनी कामगार व अन्य प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
याबाबत जिल्हा परिषद बांधकाम खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांना वारंवार भेटीगाठी घेऊन ही झुडपे काढण्यासाठी अर्ज, विनंत्या करण्यात आल्या. मात्र, अद्यापही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. कदमवस्ती, पागळेवस्ती, शिरसटमळा यासह वाड्यावस्त्यावर सार्वजनिक पाणीपुरवठ्याची कोणतीही योजना कार्यान्वित नाही. येथे असणाऱ्या हातपंपाची पाणीपातळी घटली आहे. वेळोवेळी प्रस्तावासह मागणी करूनही पंचायत समितीने दुर्लक्ष केल्यामुळे अद्याप टँकर सुरू करण्यात आला नाही. यामुळे येथील पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. या परिसरात पाण्याचा टँकर त्वरित सुरू करावा. स्वच्छतागृहाचे रखडलेले अनुदान त्वरित मिळावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बापूराव शिरसट, सत्यवान कदम, दत्तात्रय पागळे आदी कार्यकर्त्यांनी दिला.
पालखी येण्यापूर्वीच काटेरी झाडे तोडून रस्ते व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याचा ठराव झाला आहे. ४०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी टँकर मागणीचा अर्ज प्राप्त आहेत. प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला जाईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत २२०० रुपये अनुदान सुमारे १७ लाभार्थ्यांना स्वच्छतागृह पूर्ण केल्यामुळे वाटप करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाचे अपूर्ण काम असणाऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेले नाही. ज्या स्वच्छतागृहांचे काम पूर्ण आहे. त्यांची अद्याप पाहणी पथकाने केली नसल्याने अनुदान मंजूर झाले नाही. ज्या स्वच्छतागृहांचे काम पूर्ण झाले आहे. फोटोसह प्रस्ताव दाखल करण्याचे काम चालू आहे. ते लवकरच पूर्ण करून अनुदान मंजुरीस पाठविले जाईल.
- विजयमाला रणमोडे, ग्रामसेविका, शिरसटवाडी