विनयभंगप्रकरणी १५ दिवसात दिला निकाल
By Admin | Updated: January 25, 2017 01:26 IST2017-01-25T01:26:13+5:302017-01-25T01:26:13+5:30
विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसातच निकाल, देवून इंदापूर न्यायालयाने आरोपीस एक वर्षाचा साधा कारावा

विनयभंगप्रकरणी १५ दिवसात दिला निकाल
इंदापूर : विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पंधरा दिवसातच निकाल, देवून इंदापूर न्यायालयाने आरोपीस एक वर्षाचा साधा कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भानुदास एकनाथ मेंगावडे ( रा.राजेगाव, ता. दौंड ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होता. इंदापूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. सोनवणे यांनी हा निकाल दिला.
राजेगाव येथील मजूरी करणारी ही महिला (दि.८) रोजी सायंकाळी पाच वाजता भिगवण (ता. इंदापूर) येथे बाजार करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्याच गावच्या भानुदास मेगावडेने तिच्याजवळ जावून,तिच्या अंगास हात लावला. तसेच, माझ्याबरोबर चल असे म्हणत आरोपीने तिला ओढले. ती त्यास सोड म्हणत असताना तिचे नातेवाईक हे घटनास्थळी आले. त्यांनी काय झाले म्हणून विचारले असता विवाहितेने घडलेली घटना सांगितली. तोपर्यंत आरोपी पळून गेला. त्यानंतर दोघेही घरी आले. विवाहितेने घडलेला प्रकार भावास सांगितला. त्यानंतर भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भानुदास पवार, मदतनीस पोलीस नाईक राजू ठोंबरे यांनी तपास करून इंदापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात फियार्दीतर्फे सरकारी वकिल अॅड. अमर लोहकरे यांनी काम पाहिले. न्यायाधीश सोनवणे यांनी आरोपी भानूदास मेगावडे यास एक वर्ष साधा कारावास व ५०० रुपये दंडाची, तो न भरल्यास आणखी १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. गुन्हा घडल्यापासून १५ दिवसातच झटपट निकाल झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.