डॉक्टरांपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविरचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:56+5:302021-04-11T04:11:56+5:30
पुणे : रेमडेसिविर हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. तरीही गरज नसताना अनेक जण इंजेक्शनसाठी धावपळ करत आहेत. अनेकदा ...

डॉक्टरांपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविरचा आग्रह
पुणे : रेमडेसिविर हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. तरीही गरज नसताना अनेक जण इंजेक्शनसाठी धावपळ करत आहेत. अनेकदा तर डॉक्टरांपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविरचा आग्रह धरला जात आहे. वास्तविक हे आजाराच्या शोधात असलेलं इंजेक्शन असून कोरोनावर ते काही अंशीच उपयुक्त ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात सध्या सगळीकडेच रेमडेसिविरचा तुटवडा असलेला पाहायला मिळत आहे. लोकांनी अक्षरशः दुकानाबाहेर रांगा लावलेल्या आहेत. अनेकांना उपलब्ध नसल्याने परत जावे लागत आहे. मात्र, कोरोना झाला की काही जण लगेच रेमडेसिविरसाठी धावपळ करतात. त्याची गरज नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे. कारण रेमडेसिविर हे औषध हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. अनेक रुग्णांना ते कारण नसतानाही दिले जात आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील डॉ. समीर जोग म्हणाले, "रेमडेसिविर हे खरं तर रोगाच्या शोधात असलेल्या औषध आहे. वेगवेगळ्या साथी जेव्हा आल्या तेव्हा तेव्हा ते वापरून पाहिले गेले. कोरोनावर ते काही अंशी परिणाम करत असल्याच सुरूवातीला वाटले. पण आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशनने अभ्यास करून निष्कर्ष काढला की ते लाईफ सेविंग ड्रग नाही. या इंजेक्शनमुळे लक्षणांची तीव्रता कमी होते. अभ्यासाने हे सिद्ध झालंय की मृत्युदरावर रेमडेसिविरचा काहीच परिणाम नाही. हल्ली डॉक्टरपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविरचा आग्रह धरला जात आहे." सिम्बायोसिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन म्हणाले, "रेमडेसिविरचा वापर सरसकट होतो आहे. यामुळे गरजूंना त्याची आवश्यकता भासत आहे. लोक गरज पडेल म्हणून खरेदी करून ठेवत आहे. त्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. स्वाइन फ्लूच्या वेळी जसा औषधांवर निर्बंध घातले होते तसे निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे. टास्क फोर्सने हे औषध कधी द्यायचे याच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या डॉक्टरांनी पाळणे आणि रुग्णांनी डॉक्टरांना निर्णय घेऊ देणे गरजेचे आहे."
राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, "रेमडेसिविरचा वापर मध्यम स्वरूपच्या इन्फेक्शनमध्ये होतो.
सौम्य रुग्णांमध्ये ते वापरलं जात नाही. मध्यम स्वरूपच्या न्यूमोनियामध्ये त्याचा वापर होतो. ते योग्य वेळी वापरणे आवश्यक आहे. रुग्ण गंभीर झाल्यावर मात्र त्याचा वापर करून फायदा नसतो. मात्र सध्या रुग्णांना जास्त त्रास होऊ नये म्हणून काही प्रमाणात डॉक्टर रेमडेसिविर वापरताना दिसतायेत. गरज पडली तर असावे म्हणून नातेवाईक ही रेमडेसिविरचा साठा करत आहेत. यामागे अर्थातच भीती आहे."