पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची छाननी करण्याचे काम रविवारी सायंकाळी पूर्ण झाले, त्यानंतर निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता सोमवारी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचे अधिकृत नारळ फुटणार आहेत. मात्र उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी ६ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी हा केवळ १४ दिवसांचाच कालावधी मिळणार आहे. महापालिकेची निवडणूक यंदा पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा मिनी विधानसभा मतदारसंघ झाला आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेक उमेदवारांनी यापूर्वीच प्रचाराला सुरूवात केली होती. मात्र शुक्रवारी पक्षाची उमेदवारी मिळून शनिवारच्या छाननीमध्ये अर्ज वैध ठरल्यानंतर आता त्यांच्या लढाईची खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. ज्या इच्छुकांनी राजकीय पक्षाची उमेदवारी मिळण्यापूर्वीच प्रचारावर मोठा खर्च केला मात्र प्रत्यक्षात उमेदवारी मिळाली त्यांना मोठा फटका बसला आहे. प्रत्येक प्रभागातील उमेदवाराला ही निवडणूक एकटयाने लढविणे अत्यंत अवघड आहे, त्याला पॅनलमधील इतर तिघा उमेदवारांना सोबत घेऊनच प्रचार करावा लागणार आहे. चौघा उमेदवारांचे टयुनिंग योग्यप्रकारे जुळवून त्यांना मतदारांसमोर जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
प्रचारासाठी उरले १४ दिवस
By admin | Updated: February 6, 2017 06:05 IST