‘शिक्षणावर धार्मिक भावनांचा प्रभाव नको’
By Admin | Updated: September 25, 2016 02:10 IST2016-09-25T02:10:34+5:302016-09-25T02:10:34+5:30
देशप्रेमी आणि देशद्रोही कोण आहे, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. सरकारही त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. परंतु, विकासाला गती देणाऱ्या शिक्षणावर सरकारचे नियंत्रण असायला हवे.

‘शिक्षणावर धार्मिक भावनांचा प्रभाव नको’
पुणे : देशप्रेमी आणि देशद्रोही कोण आहे, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. सरकारही त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. परंतु, विकासाला गती देणाऱ्या शिक्षणावर सरकारचे नियंत्रण असायला हवे. धार्मिक भावना आणि विचार हे शिक्षणापासून वेगळे केले पाहिजेत, असे प्रतिपादन कम्युनिस्ट नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार निलोत्पल बसू यांनी केले.
माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे आयोजित पहिल्या नॅशनल टिचर्स काँग्रेसमध्ये ‘शिक्षणाचा विकास होण्यामध्ये राजकीय इच्छा शक्ती कमी पडते आहे का’ या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी महाराज सयाजीराव बडोदा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. परिमल व्यास, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, मुख्य निमंत्रक व माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, प्रा. बनार्ली हांडिक, डॉ. वृंदा देशपांडे, एमआयटी संस्थेचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील आदी उपस्थित होते. बसू म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतर ही मानव संसाधन विकासाचे नियोजित उद्दिष्ट आपल्याला गाठता आलेले नाही. याचे कारण आपली राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. तरूण लोकसंख्या जास्त आहे. त्याचा योग्य वापर करून घेतला, तरच आपण ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होवू. शिक्षण क्षेत्रात योग्य गुंतवणूक केली, तर शिक्षणाचा विकास करता येणार आहे. (प्रतिनिधी)