‘रुपी’च्या गरजू, ज्येष्ठ ठेवीदारांना दिलासा
By Admin | Updated: January 1, 2016 04:26 IST2016-01-01T04:26:46+5:302016-01-01T04:26:46+5:30
रुपी बँकेच्या गरजू आणि ६० वर्षे पूर्ण व त्यावरील वयाच्या ठेवीदारांना हार्डशिप योजनेअंतर्गत एकरकमी रक्कम काढण्याचा दिलासा रिझर्व्ह बँकेकडून मिळाला आहे़ ठेवीदारांना प्रशासकीय मंडळाच्या

‘रुपी’च्या गरजू, ज्येष्ठ ठेवीदारांना दिलासा
पुणे : रुपी बँकेच्या गरजू आणि ६० वर्षे पूर्ण व त्यावरील वयाच्या ठेवीदारांना हार्डशिप योजनेअंतर्गत एकरकमी रक्कम काढण्याचा दिलासा रिझर्व्ह बँकेकडून मिळाला आहे़ ठेवीदारांना प्रशासकीय मंडळाच्या अखत्यारीत रिझर्व्ह बँकेच्या योजनेनुसार ५० हजार वा वैद्यकीय कारणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्या खात्यातून एकरकमी मिळू शकणार आहे़
रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ़ मुकुंद अभ्यंकर यांनी याबाबत माहिती दिली़ रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाला हाईशिप योजनेंतर्गत खात्यातून रक्कम काढण्यासाठीचे अधिकार यापूर्वीच रिझर्व्ह बँकने सुपूर्द केले होते़ यापूर्वी ५० हजार रुपयांसाठी दरमहा ५ हजार रुपयेप्रमाणे १० महिने अशी रक्कम आजवर दिली जात आहे़ पण अनेक ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांनी, असे हेलपाटे बँकेत घालावे न लागता मंजूर ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम निदान ज्येष्ठांना तरी एकवट घ्यावी, अशी विनंती वारंवार केली होती़ प्रशासकीय मंडळाच्या प्रयत्नांनंतर ही परवानगी मंडळाला देण्यात आली. हार्डशिप योजनेअंतर्गत आजपर्यंत ३१ हजार ७८४ अर्जदारांना एकूण १३२ कोटी ७४ लाख रुपये वाटल्याचे डॉ़ अभ्यंकर यांनी सांगितले़ मात्र, ५० हजारांची मर्यादा वाढविली नसून आता १ जानेवारी नंतर अशी एकवट रक्कम दिली जाणार आहे़ प्रशासकीय मंडळाला मिळालेल्या अधिकारांमुळे रुपी च्या ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला असून १५ डिसेंबर २०१५ पर्यंतचे सर्व अर्ज निकाली निघाले असल्याचे डॉ़ अभ्यंकर यांनी नमूद केले़ (प्रतिनिधी)
न्यायालयाचा निकाल बँकेच्या बाजूने
सेवानिवृत्ती योजनेंतर्गत २०४ कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतल्याने रिकाम्या पडलेल्या त्या त्या शाखांमधील जागा भरण्यासाठी पुण्यातून १०२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या़ याबाबत ८ कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात दावा केला होता़ त्यात न्यायालयाने या आठ जणांनी मांडलेले सर्व मुद्दे अमान्य करून रुपी बँक प्रशासनाच्या बाजूने निकाल दिला असल्याचे डॉ़ मुकुंद अभ्यंकर यांनी सांगितले़ पुण्यातील १०२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या़ यापैकी ८९ कर्मचाऱ्यांनी बदली स्वीकारली़ ३ कर्मचारी वैद्यकीय रजेवर गेले़ २ जणांनी राजीनामे दिले.