पावसामुळे पिकांना दिलासा
By Admin | Updated: October 28, 2015 01:11 IST2015-10-28T01:11:05+5:302015-10-28T01:11:05+5:30
खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात परतीच्या वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरणीयुक्त हरभरा, ज्वारी पिकांना दिलासा मिळाला आहे

पावसामुळे पिकांना दिलासा
शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात परतीच्या वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरणीयुक्त हरभरा, ज्वारी पिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे कांदापिकाचेही सिंचन होण्यास
मदत होणार आहे. मात्र, हवामानात बदल झाल्याने याचा परिणाम पिकांवर होत आहे. रोगाचा
प्रादुर्भाव वाढल्याने हातची पिके जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल घडून कमालीची उष्णता तयार होऊन, पावसासारखी परिस्थिती निर्माण होत होती. सोमवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे वळवाच्या पावसाची चाहूल लागली होती. अखेर रात्री एक ते दीडच्या सुमारास पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या ढगांमधून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हळूवार कोसळणारा वरुणराजा अल्प कालावधीतच जोरात सुरू झाला. सुमारे एक तास पडलेल्या वळवाच्या पावसाने चौफुला, वाजेवाडी, मांजरेवाडी, साबळेवाडी, मोहितेवाडी, बहुळ, सिद्धेगव्हाण, नवीनगाव, चिंचोशी आदी परिसरातील शेतांमध्ये पाणीच पाणी केले.
चालू पावसाळी हंगामात वरुणराजाची बरसण्यास दीर्घ प्रतीक्षा करायला लावली होती. मात्र,
उशिरा का होईना, परंतु मुबलक प्रमाणात पावसाची कृपा झाल्याने पाण्याचे स्रोत गच्च भरून खळखळू लागले आहेत.
परिणामी, पाण्याची चिंता दूर होऊन रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ईशान्य मोसमी पावसाच्या शिडकाव्याने पावसाळी हंगामात चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सुखद धक्का देऊन धरणीमातेचीही तृष्णा भागविल्याने रब्बी
हंगामातील कांदा, हरभरा, गहू, ज्वारी ही महत्त्वाची पिके यशस्वीरीत्या उत्पादित करण्याच्या आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत
आहेत. (वार्ताहर)